महावितरण कर्मचार्यांचा जेसीसतर्फे सन्मान
जनतेच्या रोषाला सामोरे जावून कर्तव्य बजावणार्यांचा सन्मान गरजेचा : डॉ.प्रसन्ना अहिरे
चाळीसगाव : शहरात नुकताच जेसीसतर्फे महावितरण कंपनीतील वायरमन बांधवांचा सत्कार सन्मानचिन्ह देऊन करण्यात आला. यावेळी जेसीस अध्यक्ष डॉ.प्रसन्ना अहिरे म्हणाले की, ऊन वारा, पाऊस यांची तमा न बाळगता आपल्याला वीज सुरळीत रहावी म्हणून नेहमी प्रयत्नशील असलेला हा दुर्लक्षित घटक कुठेतरी आपल्याला सतत उडेजात ठेवण्यासाठी प्रयत्नशील असतो, तरीही जनतेचा रोषाला सामोरे जाऊन आपले कर्तव्य निभावत असतो, त्यांच्या कार्याचा सन्मान व्हावा हाच या मागचा हेतू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मेहनतीचे झाले चीज : अनिल चव्हाण
यावेळी अभियंता अनिलजी चव्हाण म्हणाले की, आमच्या या परीवारातील सत्कार जो आपण आज आयोजित केला, तो चिरकाळ आमच्या लक्षात राहील. या मुळे आमच्या कर्मचारी बांधवाना नक्कीच आपल्या कार्याचे, मेहनतीचे चीझ झाल्याचे समाधान आहे. यावेळी निवृत्त कर्मचारी प्रताप सपकाळे जेसी दिनेश चव्हाण व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी खुशाल पाटील, अफसर खाटीक, धर्मराज खैरनार, साहिल दाभाडे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन श्रद्धा शिंदे यांनी तर आभार खैरनार यांनी मानले.

