शिवसेनेच्या पाठपुराव्याने वीज बिल झाले कमी
भुसावळातील ग्राहकांनी देयके तपासून घ्यावी : प्रा.धीरज पाटील
भुसावळ : कोरोनामुळे माहे एप्रिल व मे 2020 मध्ये मीटर रीडिंग, चाचणी, बिल वितरण बंद करण्यात अल्यानंतर वीज ग्राहकांना सरासरी वीज बिले देण्यात आली होती मात्र मिशन बिगैन अगैन सुरू झाल्यानंतर माहे जून-20 पासून महावितरणने ग्राहकांचे मीटर रीडिंग घेण्यास सुरूवात केली आहे मात्र भुसावळातील अनेक ग्राहकांना फेब्रुवारी 2021 च्या देयकात मागील 22 महिन्यांची सरासरी रक्कमेची अतिरीक्त देयके प्राप्त झाली होती. शिवसेनेकडे या तक्रारी आल्यानंतर सेना पदाधिकार्यांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर वीज बिलांमध्ये सरासरी 50 टक्के फरक आढळून आल्याने वीज ग्राहकांनी समाधान व्यक्त केले.

शिवसेनेच्या पाठपुराव्याला यश
श्रीनगर, भोईनगर, विद्यानगर, महालक्ष्मी नगर, भुसावळ हायस्कूल परीसरातील ग्राहकांनी शिवसेनेकडे वीज बिलांबात तक्रारी दाखल केल्या. शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार चंद्रकांत पाटील, उपजिल्हा संघटक विलास मुळे, उपजिल्हाप्रमुख अॅड.श्याम श्रीगोंदेकर, कार्यालयीन उपजिल्हाप्रमुख प्रा.उत्तम सुरवाडे, तालुकाप्रमुख समाधान महाजन, विधानसभा क्षेत्रप्रमुख संतोष सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरप्रमुख निलेश महाजन, शहर प्रमुख बबलू बर्हाटे यांच्या सहकार्याने महावितरणच्या अधिकार्यांशी तालुका संघटक प्रा.धीरज पाटील यांनी चर्चा करून पाठपुरावा सुरू केल्याने 50 टक्क्यांपर्यंत वीज ग्राहकांने बिले कमी करून मिळाली आहेत. भोईनगर येथील काशीनाथ भोई यांचे 25 हजार 30 रुपयांचे देयक 11 हजार रुपये, विद्यानगर येथील लक्ष्मण चौधरी यांचे 32 हजार 330 रुपयांचे देयक सात हजार 580 रुपये, भुसावळ हायस्कूलजवळील रमेश कोलते यांचे दोन हजार 290 रुपयांचे देयक 1500 रुपये, श्रीनगर येथील अरुण तळेले यांचे 15 हजार 50 रुपयांचे देयक तीन हजार रुपये, महालक्ष्मीनगरातील शशी महाजन यांचे 14 हजार 500 रुपयांचे देयक पाच हजार रुपये अशी दुरुस्त करण्यात आली.
शिवसेनेच्या पाठपुराव्याला यश
परीसरातील नागरीकांच्या समस्या महावितरणच्या अधिकार्यांसमोर शिवसेनेच्या वतीने मांडण्यात आल्या व अनेक ग्राहकांना दिलासा मिळाला. रीतसर पद्धतीने मीटर वाचन आणि देयक वाटप केले नाही म्हणून या तक्रारी निर्माण झाल्या आहेत, मीटर वाचन एजन्सीला दंड करावा अन्यथा महावितरण विरोधात आंदोलन पुकारले जाईल, अशी भूमिका ग्राहकांनी घेतली आहे. दरम्यान, दुरुस्ती झाल्यानंतर देयकांच्या रक्कमेत 50 टक्के फरक आढळून आला आहे. ग्राहकांनी देयके अचूक तपासून घ्यावीत. भुसावळातील वीज ग्राहकांना देयकांबाबतीत तक्रारी असल्यास जामनेर रोडवरील मोटूमल चांदवानी चौक येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहन भुसावळ शिवसेनेच्या पदाधिकार्यांच्या वतीने प्रसिध्दी प्रमुख गोकुळ बाविस्कर यांनी केले आहे.
