धुळे जिल्हाधिकारी संजय यादव यांना कोरोना


मास्क हीच कोरोना विषाणूच्या विरोधातील ढाल

धुळे : धुळे जिल्हाधिकारी संजय यादव यांच्या कोरोना विषाणूच्या रॅपिड अँटिजन चाचणीचा अहवाल पॉझीटीव्ह आला असून माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी कोरोना विषाणूची प्रारंभिक लक्षणे दिसताच चाचणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी यादव यांनी केले आहे.

कोरोना रोखण्यासाठी मास्क हेच शस्त्र
जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळेच गेल्या आठवड्यात वरीष्ठ अधिकार्‍यांसमवेत धुळे शहरातील अशा गर्दी होणार्‍या भागांतील नागरिकांचे समुपदेशन करणे, त्यांच्यामध्ये जनजागृती व्हावी यासाठी फेरी काढून त्यांना मास्क वापरण्याचे आवाहन करण्यात आले होते. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्क हे महत्वाचे शस्त्र आहे. नागरिकांनी घाबरून जावू नये. पहिल्या लाटेप्रमाणे ही लाट रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन आरोग्य विभागाच्या माध्यमातून सज्ज आहे. या प्रयत्नांना सर्व धुळेकर नागरीकांनी कोरोना विषाणूच्या बाबतीतील सर्व नियमांचे पालन करीत सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी संजय यादव यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी कोरोनाबाधीत
जिल्हाधिकारी यादव यांची कोरोना विषाणूच्या रॅपिड अँटिजेंन चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यादव यांनी म्हटले आहे की, धुळे जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या पहिल्या लाटेत सर्वांच्या सामूहिक कामगिरीमुळे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यात जिल्हा प्रशासनाला यश आले होते. त्यामुळे सक्रिय रुग्णांची संख्या 91 पर्यंत खाली आली होती. धुळे जिल्ह्यात आतापर्यंत 15 हजार 749 रुग्ण पॉझीटीव्ह आढळून आले आहेत. त्यापैकी 392 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या 741 रुग्ण सक्रिय आहेत. या पार्श्वभूमीवर मागील आठवड्यात नागरीकांमध्ये मास्क विषयी जनजागृतीसाठी पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित, धुळे महानगरपालिका आयुक्त अजिज शेख यांच्या समवेत शहराच्या काही भागातून फेरी काढली. यावेळी अनेक नागरीक विना मास्क, सोशल डिस्टन्सचा अभाव आणि राज्य शासनाच्या नियमाचे उल्लंघन करताना दिसून आले. त्यांच्यावर तेथेच दंडात्मक कारवाई करण्यात आली. यापुढेही नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर कारवाई सुरूच राहील. माझे धुळेकर जनतेला आवाहन आहे की, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रत्येकाने मास्कचा वापर करावा. सोशल डिस्टन्स पाळावे. कोरोना विषाणूचे रुग्ण वाढत असताना काही तरुण बेफिकिरने वागत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. ही गोष्ट योग्य नाही. त्यासाठी समाजातील ज्येष्ठांनी तरुणांना मास्क वापरण्यासाठी प्रवृत्त केले पाहिजे. त्यांचे प्रबोधन केले पाहिजे. ज्येष्ठांनी लहान्याची आणि लहाण्यांनी ज्येष्ठांची काळजी घेण्याची ही वेळ असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !