आचेगावचे डॉ.नितीन पाटील हे नासी फेलोशिपने सन्मानीत
वरणगाव : भुसावळ तालुक्यातील आचेगाव येथील रहिवासी व भोपाळ येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अॅण्ड रीसर्च सेंटर (आईसर) येथे कार्यरत असलेले डॉ.नितीन पाटील यांनी रसायनशास्त्र या विषयातील केलेल्या संशोधनाबद्दल द नॅशनल अॅकॅडमी ऑफ सायन्सेस, इंडिया या संस्थेने फेलोशीप प्रदान करून नुकताच गौरव केला. या यशाबद्दल त्यांचे परिसरात कौतुक होत आहे.
कार्याची दखल घेत फेलोशीप
विज्ञान व सामाजीक क्षेत्रात उच्च कामगिरी करणार्या भारतातील नामवंत संशोधनकांना राष्ट्रीय विज्ञान दिना निमित्त द नॅशनल अॅकॅडमी ऑफ सायन्सेस या संस्थेच्या वतीने गौरव करण्यात येतो. डॉ.नितीन पाटील यांनी आवर्त सारणीतील मुलद्रव्यांच्या संप्रेरके म्हणून उपयोग करून विविध प्रकारच्या रासायनिक अभिक्रीयांचा वापर करण्याचे व विविध प्रकारची नैसर्गीक मुलद्रव्य आणि त्यांचे अनुरूप मुलद्रव्य तयार करण्यावर त्यांचे संशोधन कार्य केले आहे. 120 पेक्षा जास्त शोधनिबंध आंतरराष्ट्रीय जनरलमधे प्रसिध्द झाले आहेत तर अनेक विद्यार्थ्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली पीएचडी पदवी संपादन केली आहे. या कार्याची दखल घेवून नुकतेच विज्ञान दिनानिमित्त त्यांना फेलोशिप देवून गौरव करण्यात आला. या यशाबद्दल श्री शारदा शिक्षण मंडळ दिपनगर तालुका भुसावळ या संस्थेचे अध्यक्ष रमेश निवृत्ती गाजरे यांनी कौतुक केले आहे.

