शाळाबाह्य विद्यार्थी शोध मोहिमेस विरोध
मुक्ताईनगर : शाळाबाह्य, अनियमित व स्थलांतरीत मुलांना शाळेच्या प्रवाहात दाखल करण्यासाठी विशेष शोध मोहिमेस स्थगिती देण्याबाबत मुख्याध्यापक संघ, शिक्षक लोकशाही आघाडी, माध्यमिक शिक्षक संघ आणि आदिवासी विकास विभाग अनुदानीत आश्रमशाळा कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने नुकतेच तहसीलदार व गटशिक्षणाधिकारी मुक्ताईनगर यांना निवेदन देण्यात आले.
कोविडचा प्रादुर्भाव होण्याची भीती
जळगाव जिल्ह्यात कोरोना सदृश्य स्थितीमध्ये आज पाचशेच्या वर रुग्ण असून मुक्ताईनगर तालुक्यामध्ये शंभरावर रुग्ण आहेत आणि अशा स्थितीमध्ये शाळाबाह्य व अनियमित, स्थलांतरीत मुलांच्या निवासस्थानी वाडा, वस्तीवर ाऊन त्यांचे शोध मोहिम राबवणे कामी नियोजन करण्यात आले आहे. 1 ते 10 या कालावधीत प्रत्यक्ष कामकाज सुरू करण्याबाबत शासन स्तरावरून सूचित करण्यात आले असून याकामी जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनाच्या शिक्षकांच्या नियुक्यासुद्धा करण्यात आल्या आहेत आणि शिक्षण बंदचे कामही सुरू आहे परंतु सध्या कोविड 19 या साथरोगाचा प्रादुर्भाव वाढलेला असल्यामुळे जिल्ह्यातील शाळांमध्ये विद्यार्थी उपस्थितीला बंदी घालण्यात आली आहे. शासनाने या आजाराचा फैलाव होऊ नये म्हणून अनेक मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. आपल्या जिल्ह्यातदेखील त्या लागू केलेल्या आहेत. अशा परीस्थितीत शाळाबाह्य, अनियमित व स्थलांतरीत मुलांना शाळेच्या प्रवाहात दाखल करण्यासाठी विशेष शोध मोहिम राबवण्यासाठी नियुक्त शिक्षकांना प्रत्यक्ष घरोघरी फिरून माहिती गोळा करावयाची असल्याने यात कोविड 19 चा प्रादुर्भाव होण्याबाबत भीती निर्माण झाली आहे. कोविड 19 चा प्रभाव कमी होईपर्यंत शोधमोहीम स्थगित करण्यात यावी व याबाबतचे आदेश सर्व संबंधितास देण्यात यावे, अशा प्रकारचे विनंती अर्ज नुकताच देण्यात आला.

यांच्या पत्रकावर स्वाक्षर्या
या पत्रकावर मुख्याध्यापक संघाचे तालुकाध्यक्ष आ.पी.पाटील, शिक्षक लोकशाही आघाडीचे तालुकाध्यक्ष शिवचरण उज्जैनकर, माध्यमिक शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष एस.डी.सांगळकर, आदिवासी विकास विभाग अनुदानीत आश्रमशाळा कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्याचे राज्याध्यक्ष राजेश वासुदेव पाटील, व्ही.एस.चौधरी, एस.डी.ठाकूर, एन.पी.भोंबे, विनायक वाडेकर, अशोक मांगो लोखंडे आदी मुख्याध्यापक व शिक्षक बंधू सोशल डिस्टंसिंगचे पालन करून उपस्थित होते.
