पोलिसच असे वागू लागल्यास कायदा आणि सुव्यवस्था अबाधीत राहणार कशी ?
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा सवाल : प्रकरण केवळ वाझेंपुरते मर्यादित नाही !
मुंबई : राज्यात सुरक्षेची जबाबदारी असलेले पोलिसच असे वागू लागले तर कायदा आणि सुव्यवस्था राहील कशी ? असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला. सचिन वाझेंवर झालेल्या अटकेच्या कारवाईप्रकरणी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस बोलत होते. मुंबई पोलीस दलातील एपीआय सचिन वाझे यांना अंबानींच्या घरासमोर सापडलेल्या स्फोटकांप्रकरणी एनआयएने अटक केली आहे. या कारवाईमुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे.
कारवाई ही केवळ सुरुवात
फडणवीस म्हणाले की, या प्रकरणात सचिन वाझेला पाठीशी घालण्याचा प्रयत्न सत्ताधार्यांकडून झाला. मुख्यमंत्र्यांनी सचिन वाझे हा लादेन आहे का? असा प्रतिप्रश्न करत वकिली करण्याचा प्रयत्न केला. या प्ररणात एनआयएला अनेक पुरावे मिळाले आहेत. खरंतर हा या प्रकरणाचा एकच भाग आहे. दुसरा भाग समोर यायचा आहे. मनसुख हिरेन यांच्या मृत्यूप्रकरणामध्येही मोठे पुरावे आणि धागेदोरे एनआयएला मिळाले आहेत. त्यामुळे आता या प्रकरणात कारवाई होईल अशी अपेक्षा आहे. मात्र ही कारवाई ही केवळ सुरुवात आहे, असे फडणवीस म्हणाले. हे प्रकरण केवळ वाझेंपुरते मर्यादित नाही. या प्रकरणात कुणाची काय भूमिका आहे, हेही समोर यायला हवे, अशी अपेक्षा फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.

