सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन वाझेंना अटक
मुंबई : अडचणीत सापडलेले सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन वाझेंना अखेर एनआयएने शनिवारी मध्यरात्री अटक केली आहे. या अटकेमुळे मुंबई पोलिस दलात खळबळ उडाली असून आणखी काही अधिकार्यांची चौकशी होण्याची शक्यता आहे. अंबानींच्या घराबाहेर लावलेल्या स्कॉर्पिओच्या कटात थेट वाझेंचा सहभाग असल्याचा संशय आल्याने वाझेंना अटक करण्यात आली आहे. या कटात आणखी 5 ते 7 जणांचा समावेश असल्याची शक्यता आहे.
आणखी काही अधिकारी रडारवर
स्कॉर्पिओ ठेवून दुसर्या इनोव्हातून आलेल्या चालक आणि अन्य एका व्यक्तीसह दुसर्या चालकाला अटक होण्याची शक्यता आहे. यासाठी एनआयएच्या तीन टीम रवाना झाल्या आहेत. पोलीस अधिकारीही रडारवर असल्याने पोलीस आयुक्तालयात खळबळ उडाली आहे. वाझे यांनी अटकेपासून वाचण्यासाठी शुक्रवारीच जिल्हा सत्र न्यायालय ठाणे येथे अंतरीम जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. एनआयएने सांगितल्यानुसार, सचिन वाझे यांना आईपीसीच्या कलम 286, 465, 473, 506(2), 120 बी आणि 4 (ए)(बी)(आय) स्फोटक वस्तू कलम 1908 अंतर्गत अटक करण्यात आली आहे. या कलमांमध्ये वाझेंनी ही कार तिथे लावण्यात महत्वाची भूमिका बजावल्यासंदर्भात कलमाचा समावेश आहे. वाझेंवर फसवणूक, विस्फोटकांशी निष्काळजीपणा बाळगणे, बनावट मोहर बनविणे आणि धमकी देण्याचे आरोप लावण्यात आले आहेत. स्कॉर्पिओ कारचे मालक मनसूख हिरेन हत्या प्रकरणातही वाझेंचे नाव येत आहे. वाझे यांचा अंबानी यांच्या निवासस्थानाशेजारी जिलेटीनने भरलेली कार पार्क करण्याच्या कटात थेट सहभाग होता, असा आरोप एनआयएने लावला आहे. यामुळे मनसूख हिरेन मृत्यू आणि स्फोटकांच्या कारचा थेट संबंध वाझेंशी जोडला जाण्याची शक्यता आहे.

