धुळ्यातील लाचखोर हवालदाराला चार दिवसांची पोलिस कोठडी


सामोड्यात 10 हजार मागणारा मुख्याध्यापकाचीही सबजेलला रवानगी

धुळे : सट्टापेढी सुरू करण्यासाठी 15 हजारांची लाच स्वीकारताना धुळे पश्चिम देवपूर पोलिस ठाण्यातील हवालदार छोटू दामू बोरसे यास धुळे एसीबीने मंगळवारी अटक केली होती. आरोपीला धुळे न्यायालयात बुधवारी हजर केल्यानंतर त्यास न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. दरम्यान, सामोडे येथील मुख्याध्यापकाला थकीत बिलासाठी शिक्षिकेकडे 10 हजारांची मागणी केल्याप्रकरणी मुख्याध्यापक प्रमोद विठ्ठल जगताप यासदेखील मंगळवारी अटक करण्यात आली होती. आरोपीला बुधवारी न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावल्याने त्याची सबजेलला रवानगी करण्यात आली.

लाचखोरांवरील कारवाईने धुळे जिल्ह्यात खळबळ
नगाव व चिचगाव येेथील सट्टापेढी चालवण्यासाठी दरमहा 30 हजार रुपये देण्याची मागणी छोटू बोरसे या हवालदाराने केली होती. तडजोडीअंती 15 हजार रुपये देण्याचे ठरल्यानंतर एसीबीकडे तक्रार करण्यात आली. मंगळवारी सकाळी सापळा रचण्यात आला व 15 हजारांची रक्कम स्वीकारताना छोटू बोरसे यास रंगेहाथ अटक करणयात आली.

मुख्याध्यापकही जाळ्यात
आदिवासी आश्रमशाळेतील एका शिक्षिकेचे थकीत बिल काढण्यासाठी सामोडे येथे मुख्याध्यापक प्रमोद विठ्ठल जगताप यांनी दहा हजार रुपयांची मागणी केली होती. याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक पथकाकडे तक्रार केल्यानंतर जगताप यांना रंगेहात पकडले. ही कारवाई धुळे एसीबीचे उपअधीक्षक सुनील कुर्‍हाडे, निरीक्षक मनजितसिंग चव्हाण, प्रकाश झोडगे या अधिकार्‍यांसह जयंत साळवे, संतोष हिरे, कृष्णकांत वाडिले यांच्या पथकाने केली.


कॉपी करू नका.