अत्याचाराच्या गुन्ह्यातून डॉ.सय्यद यांना न्यायालयाने केले निर्दोष मुक्त

भुसावळ- रावेर ग्रामीण रूग्णालयातील तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ. सय्यद मंसूर कादरी यांच्यावर अत्याचार केल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल होता. भुसावळ अतिरीक्त जिल्हा सत्र न्यायाधीश एस.पी. डोरले यांच्या न्यायासनापुढे खटल्याचे कामकाज चालल्यानंतर डॉ.सय्यद यांचा गुन्हा सिद्ध न झाल्याने बुधवारी त्यांना निर्दोष मुक्त करण्यात आले. रावेर येथील ग्रामीण रूग्णालयातील तत्कालिन वैद्यकीय अधिकारी डॉ. कादरी यांनी लग्नाचे आमिष दाखवून एका महिलेशी शारीरीक संबंध ठेवले मात्र नंतर विवाहास नकार दिल्याचा आरोप होता तर पीडीतेच्या फिर्यादीवरून रावेर पोलिस ठाण्यात 19 जुलै 2010 ला गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी खटल्याचे कामकाज भुसावळ येथील अतिरीक्त जिल्हा सत्र न्यायाधीश एस.पी. डोरले यांच्या न्यायासनासमोर चालले. यात संशयीत डॉ. कादरीतर्फे अॅड. प्रफुल्ल पाटील यांनी 12 साक्षीदारांची साक्ष नोंदवली. अक्षर तज्ञांचा अहवाल आणि गर्भपात अहवाल यांची पडताळणी करण्यात आली. यात गुन्हा सिद्ध न झाल्याने न्या.डोरले यांनी बुधवारी निकाल देत डॉ. सय्यद मंसूर कादरी यांना निर्दोष मुक्त केले.
