साई मित्र परीवाराचा पुढाकार : ग्रामीण डिसीसीएचला दिली 80 हजारांची अत्यावश्यक औषधी


भुसावळ : कोविड रुग्णांवर उपचारासाठी औषधांचा तुटवडा भासतो, तर बर्‍याचवेळा शासनाकडून परीणामकारक औषधांचा साठा वेळेवर होत नसल्याने शहरातील नगरसेवक निर्मल कोठारी व साई मित्र परीवाराने ग्रामीण रुग्णालय डेडीकेटेड कोविड सेंटरला तब्बल 80 हजार रुपयांची आवश्यक औषधे दिली. या औषधांतून कोविडच्या गोरगरीब रुग्णांवर उपचारासाठी मदत होणार आहे.

औषधांमुळे उपचाराची सोय
ग्रामीण रुग्णालय व ट्रामा सेंटर डीसीसीएचमध्ये गोरगरीब कोविडच्या रुग्णांवर उपचार केले जातात. शासनाकडून औषधांचा पुरवठा होतो, मात्र तो बर्‍याच वेळा कमी प्रमाणात असतो. काही अत्यावश्यक किंवा रुग्णांना वापरणे जरुरीच असतानाही त्यांची उपलब्धता नसते. यामुळे उपचारादरम्यान अनेक अडथळे निर्माण होतात. यामुळे नगरसेवक निर्मल कोठारी यांनी वैद्यकिय अधिकार्‍यांकडून याबाबतच रुग्णांवर उपचारासाठी आवश्यकता असलेल्या औषधांची माहिती घेवून गरजेनुसार 80 हजार रुपयांच्या औषधांचा पुरवठा केला. साई मित्र परीवाराचे सदस्य कंत्राटदार योगेश पाटील यांनी 21 हजार रुपये, माजी नगरसेवक रमाकांत महाजन, जिनींग व्यवसायीक सुरेश अग्रवाल, व्यापारी गणेश बेहेरा यांनी प्रत्येकी 5 हजार रुपये तसेच नगरसेवक निर्मल कोठारी यांनी 44 हजार रुपये मदतनिधी देवून ही औषधे उपलब्ध करुन दिली आहेत. यावेळी वैद्यकिय अधीक्षक डॉ. मयुर चौधरी, डॉ. विक्रांत सोनार, डॉ. भालचंद्र चाकोरकर आदींसह वैद्यकिय कर्मचारी उपस्थित होते. साईमित्र परिवाराच्या सदस्यांनी वितरणासाठी मदत केली.

या औषधांचा केला पुरवठा
मेरोपेनेम इंजेक्शन, पिप्झो इंजेक्शन, रक्तदाब मोजण्यासाठी डिजिटल मशीन, रक्तातील साखर मोजण्यासाठी ग्लुकोमीटर, ताप मोजण्यासाठी डिजिटल थर्मोमीटर, 100 एमएल एचएस 3200 बाटल्या, 100 सर्जिकल हँड ग्लोव्हज, 240 ऑक्सिजन मास्क , रिजरवायर ऑक्सिजन मास्क 60 असे औषधे व साहित्य साई सेवा समिती ग्रुपतर्फे देण्यात आले.

आगामी काळात मदतीचा हात : पिंटू कोठारी
ग्रामीण रुग्णालयात काही औषधे व साहित्य नसल्याने उपचारांमध्ये अडथळा येतो असे असलेतरी सर्व डॉक्टर, परीचारीका, आरोग्य कर्मचारी गोरगरीब रुग्णांची सेवा करून खुप चांगल्या पध्दतीने उपचार करीत आहेत. ही गरज ओळखून आम्ही औषधांचा पुरवठा केला. वर्षभरापासून सेवा सुरू असून आगामी काळातही ती निरंतर सुरू राहणार असल्याचे नगरसेवक पिंटू कोठारी म्हणाले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !