धोका अजून टळला नाही : भुसावळात कोरोनामुळे तीन रुग्ण दगावले
भुसावळ : कोरोना बाधितांच्या मृत्यूचे तांडव अजूनही थांबलेले नाही. शुक्रवारी देखील उपचारादरम्यान भुसावळ तालुक्यातील 62 वर्षीय पुरुष 55 व 63 वर्षीय महिला दगावली असून शुक्रवारी सायंकाळी त्याबाबत प्रशासनाला अहवाल प्राप्त झाला आहे. कोरोना स्प्रेड रोखण्यासाठी प्रशासनाने 14 ते 1 मे दरम्यान लॉकडाऊन जाहीर केला आहे मात्र रुग्ण संख्या नियंत्रणात येत नसल्याने लॉकडाऊन पुन्हा वाढवण्यात आला आहे. शहरात सकाळी 7 ते 11 दरम्यान अत्यावश्यक दुकाने सुरू असलीतरी नागरीक एकाचवेळी गर्दी करीत असल्याने तसेच सोशल डिस्टन्स पाळत नसल्याची बाब सातत्याने दिसून येत आहे. शिवाय नागरीकांना मास्क लावण्याबाबतही दिरंगाई होत असल्याने पोलिस व पालिका प्रशासनाकडून दंडात्मक कारवाई केली जात आहे.
भुसावळ तालुक्यात 295 रुग्णांचा मृत्यू
भुसावळात आतापर्यंत 10 हजार 793 रुग्णांना कोरोनाची लागण झाली असून त्यातील 9 हजार 431 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत 295 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून सध्या एक हजार 67 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती प्रशासनाने दिली.



