भुसावळातील नगरपालिका दवाखाना ते एचडीएफसी बँकेच्या पुलापर्यंत नूतनीकरण व्हावे


भुसावळातील शिवसेना पदाधिकार्‍यांचे मुख्याधिकार्‍यांचे साकडे : दुभाजकांचे व्हावे सुशोभीकरण ; मुरूमाची डागडूजी करून बिले लाटण्यात आल्याचा आरोप

भुसावळ : शहरातील एचडीएफसी बँकेच्या समोरील रस्ता संपुर्णपणे खिळखिळा झालेला असून पावसाळा सुरू होण्यापूर्वी या रस्त्याचे नूतनीकरण करावे तसेच शहरातील दुभाजकांचे व्हावे सुशोभीकरण, अशी मागणी शहरातील शिवसेना पदाधिकार्‍यांनी भुसावळ मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांना निवेदनाद्वारे केली.

तर आंदोलनाचा इशारा
निवेदनाचा आशय असा की, या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक होते. गेल्या चार वर्षापासून वर्षातून दोनदा या रस्त्यावर मुरूम टाकून डागडुजी करण्यात आली व बिले लाटली गेली परंतु पावसाळ्यात दरवर्षी या ठिकाणी दोन फुटापर्यंत खड्डे निर्माण होतात त्यामुळेच रस्त्यावर दररोज चार ते पाच दुचाकीस्वार पडतात. रीक्षा चालकांची कंबरडे मोडतात आणि बसने जाणार्‍यांची तर हाडेच खिळखिळी होतात. या रस्त्याने डांबरच पाहिलेले नाही. दुचाकीस्वार रस्त्यावरून जाताना कधी पडेल हे सांगता येत नाही. गतवर्षी या ठिकाणी मुरूम आणि त्यासोबत मोठ-मोठे दगड टाकण्यात आले होते. नेहमीचा रहदारीचा रस्ता असून देखील फार गांभीर्याने याकडे पाहिले जात नाही. पावसाळ्यापूर्वी रस्त्याचे नूतनीकरण न झाल्यास शिवसेनेतर्फे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. निवेदन देताना शिवसेना शहरप्रमुख बबलू बर्‍हाटे, माजी नगरसेवक दीपक धांडे, उपशहरप्रमुख धनराज ठाकूर, ग्राहक संरक्षण कक्षाचे देवेंद्र पाटील उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !