जळगावातील रेल्वे गेटसाठी औरंगाबाद खंडपीठात याचिका
रेल्वेसह पालिका प्रशासनाला खंडपीठाने बजावली नोटीस ; चार आठवड्यात खुलासा सादर करण्याचे आदेश
जळगाव : शिवाजीनगर उड्डाणपुलाच्या उभारणीमुळे वाहतुकीचा मार्ग बंद झाल्याने होणारे हाल पाहता तात्पुरते रेल्वे गेट उभारावे या मागणीसाठी औरंगाबाद खंडपीठात इशिका दीपककुमार गुप्ता यांच्यावतीने रीट पिटीशन दाखल करण्यात आली असून रेल्वे प्रशासनासह पालिकेला नोटीस बजावत चार आठवड्यात खुलासा मागवण्यात आला आहे. याचिकाकर्त्या गुप्ता यांच्यावतीने अॅड.गिरीष नागोरी हे काम पाहत आहेत.
रेल्वे गेटसाठी खंडपीठात धाव
शिवाजीनगर उड्डाणपुलाच्या कामामुळे शिवाजीनगरसह ग्रामीण भागातून येणार्या नागरिकांचा थेट टॉवर चौकात येण्याचा मार्ग बंद आहे. त्यामुळे बहुसंख्य नागरिक हे तहसील कार्यालयाकडून रेल्वेलाइन ओलांडून ये-जा करीत आहेत. त्यामुळे तहसील कार्यालयाच्या मार्गाने रेल्वेलाइनवर तात्पुरता रस्ता तसेच रेल्वे गेट उभारण्याची मागणी आहे. याच मागणीसाठी इशिका दीपक गुप्ता यांनी औरंगाबाद खंडपीठात रीरट पिटिशन दाखल केले आहे. त्यात मंगळवारी न्या. एस.व्ही. गंगापुरवाला व न्या. मंगेश पाटील यांच्या न्यायासनासमोर सुनावणी झाली. त्यात खंडपीठाने रेल्वेच्या भुसावळ विभागाचे डीआरएम विवेककुमार गुप्ता, केंद्र सरकार तसेच महापालिका प्रशासनाला नोटीस काढली आहे.