भुसावळात लॉकडाऊनचे उल्लंघण : सुपरशॉपीसह तीन दुकाने सील
भुसावळ : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शासनाने लॉकडाउन सदृश निर्बंध लादले आहेत. या आदेशाचे उल्लंघण करून शहरातील कुकरेजा सुपर शॉपीमध्ये तब्बल 100 ग्राहकांची उपस्थिती होती. त्यात कुठलेही फिजिकल डिस्टन्सिंग पाळले न गेल्याने प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे यांनी पाहणी करून सुपरशॉप सील केले. तसेच अर्धे शटर उघडे ठेवून सुरू असलेली इतरही दोन कापड दुकाने सील करण्यात आली. या कारवाईचा धसका घेत इतरांनी देखील पटापट दुकाने बंद केली.
सुपरशॉपीत आढळले 100 ग्राहक
जिल्हाधिकार्यांच्या आदेशानुसार अत्यावश्यक सेवांच्या दुकानांना सकाळी 7 ते 11 अशी वेळ ठरवून दिली आहे. हा नियम शहरात पहिल्या दिवसापासून पायदळी तुडवणे सुरू आहे. अत्यावश्यक सेवांसह इतरही बहुतांश दुकाने उघडली जातात. त्यात वेळ मर्यादा आणि कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन केले जाते. दरम्यान, शुक्रवारी जामनेर रोडवरील कुकरेजा सुपर शॉपीत गर्दी झाल्याची माहिती मिळताच प्रांत सुलाणे यांच्यासह उपमुख्याधिकारी महेंद्र कातोरे, रामदास म्हस्के, संजय बाणाईते, अनिल मंडवाले, किरण मंडवाले, राजू चौधरी, जय पिंजाणी यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. त्यात सुपरशॉपीत सुमारे 100 ग्राहक होते. त्यात अनेकांच्या तोंडावर मास्क नव्हते. फिजिकल डिस्टन्सिंगचा कुठेही पत्ता नव्हता. त्यामुळे प्रांताधिकार्यांनी तातडीने डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे, मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांना बोलावून घेतले. यानंतर ग्राहकांना सुपरशॉपी बाहेर काढून पालिकेच्या माध्यमातून त्यास सील करण्यात आले. ही कारवाई सकाळी 11 वाजेपूर्वी झाली.



झिरो पोलिसाची दादागिरी
कुकरेजा सुपरशॉपीला सील केल्यावर अधिकार्यांनी अप्सरा चौक गाठला. तेथे पाहणी करताना श्रीकृष्ण गारमेंट आणि रिमिक्स शॉपी या दुकानांचे शटर अर्धे उघडे होते. ही दुकाने देखील सील करण्यात आली. दरम्यान, अप्सरा चौकात पालिकेचे पथक आल्यावर पोलिसांशी दोस्ती असलेला आणि सिंधी कॉलनीतील रहिवासी नारायण नामक झिरो पोलिसाने पालिकेचे बाजार वॉर्डातील मुकादम दिलीप सपकाळे यांच्याशी हुज्जत घातली. यामुळे गोंधळ उडाला. त्यामुळे डीवायएसपी वाघचौरे यांनी घटनास्थळ गाठले.

