केळी संशोधन केंद्र रावेर तालुक्यात हलवा : आमदार शिरीष चौधरी
खरीप हंगाम आढावा बैठकीत पालकमंत्र्यांकडे मागणी : सकारात्मक दखल घेण्याचे आश्वासन
रावेर : जळगाव जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक नुकतीच ऑनलाईन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. त्यात आमदार शिरीष चौधरी यांनी रावेर-यावल या तालुक्यात केळी हे प्रमुख पीक असल्याने केळी संशोधन केंद्र रावेर किंवा यावल या तालुक्यात असावे तसेच जिल्ह्यात सर्वात जास्त खतांची मागणी असल्याने रेल्वे वॅगन सावदा, निंभोरा व दुसखेडा येथे खतांचा रँक लावावा, अशी मागणी केली आहे. ती मागणी पालकमंत्र्यानी तत्वत मान्य केली आहे.
खतांच्या किंमती कमी करण्याचीही मागणी
मागील वर्षाच्या प्रमाणे यावेळी बोगस बियाणे आणि खतांच्या विक्रीवर अंकुश लावला गेला पाहिजे, केंद्र सरकारने खतांच्या किंमती 40 ते 50 टक्क्यांपर्यंत वाढवून बळीराजावर अन्याय केला आहे. त्या किंमती कमी करण्यासंदर्भात राज्य शासनाने ही प्रयत्न करावेत अशी मागणी आमदार शिरीष चौधरी यांनी केली तसेच रावेर-यावल तालुके बागायती तालुके असल्याने यंत्र आणि अवजारांची आवश्यकता जास्त असल्याने यांत्रिकीकरण योजनेतून जास्तीत जास्त लाभ घ्यावा व सदर योजना वर्षभर सुरू असावी तसेच ठिंबक सिंचनसाठी मिळणारी सबसिडी यांत्रिकीकरणातून वगळून ई-ठिंबक प्रणाली पुन्हा सुरू करून सबसिडी लवकर मिळण्यासाठी विशेष प्रयत्न असावेत त्याच प्रमाणे केळी पीक विम्याबाबत ही पालकमंत्र्यांनी शासनस्तरावर प्रयत्न करून पूर्वीचेच निकष लागू करण्यात यावेत ही मागणी केल्याचे आमदार शिरीष चौधरी यांनी सांगितले. कोरोना काळात रासायनिक खत विक्री करणार्या कृषी विक्रेत्यांना पॉस मशीन ऑनलाईन ऐवजी ऑफलाईन करून द्यावे तसेच या परीसरात केळी पिकासाठी रासायनिक खतांची मात्रा जास्त लागत असल्याने प्रति शेतकरी 50बॅगची अट रद्द करावी व कृषी विक्रेते तसेच त्यासाठी मार्केटिंगचे कार्य करणार्या तरुणांना लसीकरण उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी केली. या खरीपपूर्व आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानी गुलाबराव पाटील, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा कृषी अधिकारी, आमदार, खासदार, जिल्हा परीषदेच्या अध्यक्षा, जिल्ह्यातील विविध विभागांचे शासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी ऑनलाईन पध्दतीने सहभागी होते.



