बारावीच्या विद्यार्थ्यांना सराव प्रश्नपत्रिका द्या : सुरज पाटील


भुसावळ : इयत्ता बारावीची परीक्षा ऑफलाईन होणार असून कपात केलेल्या अभ्यासक्रमाच्या सराव प्रश्नपत्रिका देऊन विद्यार्थ्यांकडून सोडवून घ्याव्यात कारण प्रत्येक विषयाची तीन तासाची परीक्षा आहे. मात्र विद्यार्थ्यांचा लिहिण्याचा वेग इतका कमी झाला आहे की पेपर वेळेत पूर्ण होणार नाही याची विद्यार्थ्यांमध्ये भीती वाढत चालली आहे. प्रत्येक विषयाचे तीन प्रश्न संच शिक्षकांनी तयार करून घ्याव्यात, अशी मागणी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे युवा सेना शहरप्रमुख सुरज पाटील यांनी केली आहे. भुसावळतील विद्यार्थ्यांनी सुरज पाटील यांच्याशी संपर्क करून परीक्षेत येत असलेल्या अडचणी विषयी माहिती दिली. प्रश्नपत्रिका सोडवताना अपेक्षित वेगाने उत्तरं लिहिली नाहीत तर मार्क कमी मिळतील, अशी भीती मुलांमध्ये आहे. विद्यार्थ्यांचा लिहिण्याचा वेग कमी झाल्याने त्यांच्यासमोर अनेक प्रश्न आहेत.

विषय कळाले नाहीत, लिहिण्याचा सराव नाही
कॉन्सेप्टच नीट कळाल्या नाहीत तर आम्ही कशी परीक्षा देणार आहोत? आमच्या शंका कोण सोडवणार? शाळेत प्रत्यक्षात शिकता येत होतं. एखादा विषय समजला नाही तर शिक्षकांची थेट संपर्क करणं शक्य होतं. पण आता छोट्या-छोट्या गोष्टींसाठी शिक्षक केवळ एका विद्यार्थ्याला वेळ देत नाहीत. फीजिक्स, केमिस्ट्री, गणित, यांसारखे विषय सुद्धा व्हिडिओच्या माध्यमातून शिकवले गेले आहेत. त्यामुळे लिहिण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला नाही. शिक्षकांना प्रश्नसंच मागितले तर दिले नाहीत, पालकांना अपेक्षित उत्तरे दिली जात नाही अश्या अनेक तक्रारी विद्यार्थ्यांनी मांडल्या.



युवा सेना आंदोलनाच्या पवित्र्यात
विद्यार्थ्यांकडून शाळेत आणि खाजगी शिकवणीचे पूर्ण पैसे शिक्षकांनी घेतले आहेत त्यानुसार विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळालेले नाही, भुसावळातील सर्व शाळा महाविद्यालयाने विद्यार्थ्यांची सराव परीक्षा घेऊन ऑनलाईन उत्तरे मागवावी व परीक्षेची पूर्ण तयारी करून घ्यावी अन्यथा त्या शाळा महाविद्यालयाच्या विरोधात युवासेनेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !