पोलिसांवर गोळीबार : गारखेड्यातून आरोपी जाळ्यात
रावेर : आदिवासी भागातील सहस्त्रलिंगनजिक गस्तीवरील पोलिसांवर दुचाकीवरून आलेल्या चौघांनी ठाचणीच्या बंदुकीतून दोन गोळ्या झाडल्याची घटना मंगळवारी मध्यरात्रीनंतर घडली होती. या प्रकरणी गारखेड्यातून दोन आरोपींनी सहा.पोलिस निरिक्षक तथा तपास अधिकारी शीतलकुमार नाईक यांनी अटक केली. रमेश जगन बारेला (30, रा.गारबर्डी, ता.रावेर) व दिनेश जबरसिंग बारेला (24, रा.गारबर्डी, ता रावेर) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. आरोपींना रावेर न्यायालयात हजर केले असता 17 पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
दुचाकी थांबवण्याच्या प्रयत्नात गोळीबार
मंगळवार, 11 रोजी मध्यरात्री पेट्रोलिंग करून पोलिस कर्मचारी कॅमेरा व्हॅन (एम.एच 19 एम, 0681) ने रावेरच्या दिशेने येत असतांना रावेरकडून पालकडे दोन दुचाकी भरधाव वेगाने येत असल्याने पोलिसांनी दुचाकी थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र एक दुचाकी भरधाव निघाली तर दुसरी दुचाकी काही अंतरावर गेल्यानंतर पुन्हा मागे आली व एका संशयीताने पोलिसांच्या दिशेने ठाचणीच्या बंदुकीने दोन गोळ्या झाडल्या. संशयीतांना पकडण्यासाठी पोलिस धावताच आरोपी निसटण्याच्या प्रयत्नात असताना दुचाकी घसरली व त्याचवेळी बंदुक जमिनीवर पडली मात्र संशयीत अंधाराचा फायदा घेत पसार झाले.



गोपनीय माहितीवरून अटक
आरोपींच्या शोधासाठी डीवायएसपी नरेंद्र पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली चार पथके तयार करण्यात आली. तपास अधिकारी शीतलकुमार नाईक, पोलिस कर्मचारी राजेंद्र राठोड, संदीप धनगर, अतुल तडवी, नरेंद्र बाविस्कर व सहकार्यांनी गुप्त बातमीदारांकडून माहिती काढली व जंगलात अवैधरीत्या शिकार करणार्या लोकांची माहिती काढली असता व गारबर्डी गावातील पाच जणांनी हा गुन्हा केल्याचे समजले. त्यापैकी रमेश जगन बारेला व दिनेश जबरसिंग बारेला यांना अटक करण्यात आली. आरोपींना न्यायालयाने 17 पर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

