भुसावळात पालिकेची बेफिकीरी : भर दिवसा पथदिवे सुरू


भुसावळ : पालिकेच्या भोंगळ कारभाराचा नमूना शहरवासीयांना पुन्हा एकदा आला आहे. शहरातील जळगाव रोड विभागातील श्रीनगर, खळवाडी, काशीराम नगर परिसरात तर जामनेर रोडवरील अंतर्गत भागात गेल्या चार-पाच दिवसांपासून दिवसाही पथदिवे सुरू राहत असल्याने आश्‍चर्य व संताप व्यक्त होत आहे. शहरातील अनेक भागात पथदिवे बंद असताना संबंधित ठेकेदार दिवे बदलण्याची तसदी घेत नसताना दुसरीकडे मात्र दिवसा सुरू असलेले पथदिवे बंद होत नसल्याने विनाकारण विजेचा अपव्यय होत आहे. याबाबत पालिकेच्या वीज कंपनीच्या अधिकार्‍यांनी त्वरित दखल घ्यावी, अशी मागणी शिवसेनेचे पदाधिकारी तालुका संघटक प्रा.धीरज पाटील व परीसरातील नागरिकांनी केली आहे.

कुठे अंधार तर कुठे दिवाळी
शहरातील रस्त्यांवरील अनेक ठिकाणचे पथदिवे गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहेत. यामुळे रात्रीच्या वेळी नागरीकांसह आबालवृद्धांना अंधारातून प्रवास करावा लागत आहे. याबाबत नागरीकांनी अनेकदा तक्रारी करूनही दखल घेतली जात नसल्याचे चित्र आहे. शहरातील पथदिव्यांच्या देखभाल व दुरुस्तीसाठी कोट्यवधी रुपयांचे काम दिलेल्या कंपनीचाच ठाव ठिकाणा नाही शिवाय तक्रार करण्यासाठी असलेल्या कार्यालयातही कुणी आढळत नाही त्यामुळे सत्ताधारी व पालिका प्रशासनाने वेळीच दखल घ्यावी अन्यथा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आमदार चंद्रकांत पाटील, उपजिल्हा संघटक विलास मुळे, उपजिल्हाप्रमुख अ‍ॅड.श्याम श्रीगोंदेकर, कार्यालयीन उपजिल्हाप्रमुख प्रा.उत्तम सुरवाडे, तालुकाप्रमुख समाधान महाजन, विधानसभा क्षेत्रप्रमुख संतोष सोनवणे, शहर प्रमुख निलेश महाजन, शहरप्रमुख बबलू बर्‍हाटे व इतर पदाधिकारी यांच्या उपस्थितीत आंदोलन केले जाईल, असा इशारा तालुका संघटक प्रा.धीरज पाटील व शिवसैनिकांनी दिला आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !