कोवॅक्सीन लसीकरण प्रक्रियेतील तांत्रिक अडथळे दूर करा : प्रा.धीरज पाटील
भुसावळ : कोवॅक्सीन लसीकरणानंतर येणार्या मेसेजबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी निर्माण झाल्या असून अनेक नागरीकांना पहिली लस घेतल्याचे मेसेज मिळालेले नाहीत त्यामुळे त्यांना लसीकरणाचे प्रमाणपत्र मिळू शकलेले नाही. लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी हे प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे या नागरीकांना दुसरा डोस मिळण्यात अडचणी आल्या. दुसरा डोस घेतल्यावर काही नागरीकांना पहिला डोस घेतल्याचा मेसेज आला. या तांत्रिक समस्यांमुळे नागरीकांना मनस्ताप सोसावा लागत असून या प्रक्रियेतील अडथळे दूर करण्याची मागणी केंद्र सरकारच्या कोविन पोर्टलच्या टेक्निकल टीमकडे शिवसेनेचे तालुका संघटक प्रा.धीरज पाटील यांनी केली. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आधीच केंद्र सरकारला महाराष्ट्रासाठी वेगळ्या पोर्टलची मागणी केली आहे.
कोव्हिशिल्ड घेतल्यावर कोव्हॅक्सिनचे मेसेज
काही जणांना कोव्हिशील्ड लस घेतल्यावर कोव्हॅक्सीन घेतल्याचे मेसेज मिळाले आहेत. कोरोनाच्या दुसर्या लाटेत रुग्णसंख्या वेगाने वाढत असताना, लसीकरणाचाही वेग वाढविण्याशिवाय पर्याय नाही म्हणून तांत्रिक अडचणी लवकर दूर करणे गरजेचे आहे.



पहिला डोस घेतल्याचे सर्टिफिकेट अनिवार्य
पहिला डोस घेतल्यानंतर मेसेज न मिळालेल्या नागरीकांना पहिला डोस घेतल्याचे सर्टिफिकेट असणे अनिवार्य आहे. पहिल्या केंद्रावर जाऊन त्यांनी ते आणावे त्यामुळे दुसरा डोस मिळणे सहज शक्य होईल. पहिला व दुसरा डोस यातील अंतर 45 दिवस किंवा जास्त असावे. डोस दोनसाठी त्यांचे केंद्रावर नवीन रजिस्ट्रेशन होईल आणि दुसरा डोस दिला जाईल. दुसरा डोस घेतल्याचा मेसेजसुद्धा त्या नागिीकांच्या मोबाईलवर येईल आणि सर्टिफिकेट मिळेल, असे तांत्रिक समितीद्वारे कळविण्यात आले आहे.

