भुसावळ ऑर्डनन्स प्रशासनाची मनमानी : कंडारीकडे जाणारा रस्ता केला बंद
ज्येष्ठांसह रेल्वे कर्मचारी व ऑर्डनन्स कर्मचार्यांचे अतोनात हाल
भुसावळ : भुसावळ ऑर्डनन्स फॅक्टरी प्रशासनाने मनमानी पद्धत्तीने केंद्रीय विद्यालयाकडून कंडारी गावाकडे जाणारा रस्ता पत्र्याचे बॅरीगेटस् व लोखंडी रॉड लावून बंद केल्याने या भागातून कंडारीकडे जाणार्या नागरीकांचे अतोनात हाल होत आहेत. शेकडो ऑर्डनन्स फॅक्टरी कर्मचार्यांसह रेल्वे कर्मचारी तसेच कंडारी परीसरातील महिला, ज्येष्ठ नागरीक, शालेय विद्यार्थी नागरीकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रुग्णांना भुसावळ, जळगाव येथे दाखल करण्यासाठी मोठा त्रास सोसावा लागत आहे. शिवाय फॅक्टरी, दीपनगर, रेल्वे आणि वरणगाव परिीसरात काम करणारे अधिकारी, मजूर यांना फेर्याने कामाला जावे लागत आहे. शिक्षक सेनेचे जळगाव जिल्हाप्रमुख प्राचार्य विनोद गायकवाड, युवासेनेचे तालुका समन्वयक सुरेंद्र सोनवणे आणि परीसरातील नागरिकांनी या ठिकाणी भेट दिली असता अनेकांनी त्यांच्याकडे रस्ता बंद असल्याच्या तक्रारी मांडल्या. विशेष म्हणजे रस्ता पत्रे, इलेक्ट्रिक खांब, लोखंडी रॉड लावून बंद करण्यात आला आहे.
कायद्यानुसार वहिवाट देणे गरजेचे
1948 साली ऑर्डनन्स फॅक्टरी भुसावळचे निर्माण कंडारी शिवारातील शेतकर्यांच्या जमिनीवर करण्यात आले. जमिनी हक्क कायद्यानुसार वहिवाट किंवा रस्ता देणे गरजेचे आहे. ज्या शेतकर्यांच्या जमिनी फॅक्टरी निर्माणसाठी गेलेल्या आहेत त्यांना छोटासा रस्ता रहदारीसाठी सोडणे अपेक्षित आहे मात्र हा रस्ता बंद करून परीसरातील नागरीक, शेतकरी व त्यांच्या परीवारावर अन्याय केला जात आहे. ऑर्डनन्स फॅक्टरी भुसावळचे जनरल मॅनेजर यांची शिवसेना पदाधिकारी लवकरच भेट घेणार असून या प्रश्नासंदर्भात चर्चा करणार असल्याचे प्राचार्य विनोद गायकवाड यांनी कळविले आहे.



