भुसावळात कोरोनासोबत डेंग्यू, मलेरीया जनजागृती
नागरीकांना माहिती पत्रकांचे वाटप : आडवड्यातून किमान एकदा कोरडा दिवस पाळण्याचे आवाहन
भुसावळ : 16 मे हा दिवस राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त शहरात जळगाव रोड परीसरात आरोग्य व हिवताप विभागामार्फत कोरोना विषाणू सोबत ताप रुग्ण व कंटेनर सर्वेक्षण करण्यात आले. शिवसेनेचे तालुका संघटक प्रा.धीरज पाटील, आरोग्य कर्मचारी सुनील महाजन, आकाश सपकाळे, ज्ञानदेव चोपडे, आरोग्य सेविका लता वानखेडे यांनी नागरीकांना माहिती पत्रके वाटप करून घरातील व परिसरातील भांडी, टाक्या व टाकाऊ वस्तू यात साठविलेल्या स्वच्छ पाण्याचे सर्वेक्षण केले.
कोरडा दिवस पाळण्याचे आवाहन
पाणी साठवलेल्या भांड्यांना योग्य पध्दतीने व्यवस्थित झाकून ठेवावे, घरा भोवतालची जागा स्वच्छ आणि कोरडी ठेवावी, घराच्या भोवती, वरती वापरात नसणारे टाकाऊ साहित्य ठेऊ नये. घराच्या दारे खिडक्यांना बारीक जाळी बसवावी, कुलरचे पाणी दर दोन दिवसांनी बदलून घ्यावे, आठवडयातून किमान एकदा कोरडा दिवस पाळावा, डास अळी असलेली कंटेनर रिकामी करून घासुन पुसून स्वच्छ व कोरडी करून नंतर पाण्याने भरावे, अश्या सूचना आरोग्य कर्मचारी सुनील महाजन यांनी नागरीकांना केल्या.

नियम पाळल्यास संकट कमी : प्रा.पाटील
सध्या करोनाची दुसरी लाट राज्यात वेगात पसरते आहे. शहरी भागात रुग्ण मोठ्या संख्येने आढळत आहेत. हे संकट मोठे आहे तथापी आपण काही साध्या-सुध्या गोष्टी नीट पाळल्या आणि नियम व्यवस्थित पाळले तर आपण यासोबत इतर संकटाची तीव्रता कमी करू शकतो. कोरोनासोबत अन्य आजारांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. इतर आजार झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे, असे प्रा.धीरज पाटील यांनी नागरिकांना सांगितले.
वेळीच उपचार न घेतल्यास मृत्यूचा धोका
डेंग्यू, मलेरीया ताप घातक आजार असून रुग्णाची काळजी व वेळीच उपचार न घेतल्यास मृत्यू होऊ शकतो म्हणून नागरीकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार, जिल्हा हिवताप अधिकारी अर्पणा पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संगीता दवंगे, नगरपालिका दवाखान्याच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.किर्ती फलटणकर यांनी केले आहे.

