भुसावळात दक्ष शिक्षिकेमुळे दोन लाख लुटीचा प्रयत्न फसला
भुसावळ : वराडसीम येथून शहरातील बँकेत दोन लाख रुपयांचा भरणा करण्यासाठी आलेल्या एका ज्येष्ठ नागरीकाच्या हातातील पिशवी ओढणार्या चार ते पाच टवाळखोरांना रस्त्याने जाणार्या एका शिक्षिकेने चांगलाच धडा शिकवला. शिक्षिका ज्येष्ठाच्या मदतीसाठी धावून आल्यामुळे त्यांचे पैसे वाचले, तसेच रस्तालुटीची घटना टळली. शनिवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास जामनेर रोडवर हा प्रकार घडला.
दक्ष शिक्षिकेमुळे लूट टळली
शनिवारी दुपारी वराडसिम येथील एक वयोवृद्ध व्यक्ती शहरातील बँकेत दोन लाख रुपये भरण्यासाठी जात होते. निर्मनुष्य जामनेर रोडवरून पायी जाताना, चार ते पाच अनोळखी संशयीतांनी त्यांची रोकड हिसकावण्याचा प्रयत्न केला. ही झटापट सुरू असताना फैजपूर येथील कुसूमताई विद्यालयाच्या शिक्षिका विशाखा सुनील शिंदे (रा.गडकरी नगर, भुसावळ) यांनी हा प्रकार बघितला. त्या क्षणाचाही विलंब न लावता ज्येष्ठाच्या मदतीसाठी धावल्या. तसेच रोकड हिसकावणार्यांवर त्या तुटून पडल्या. संशयितांना ज्येष्ठांपासून लांब ढकलत त्यांनी चापटा-बुक्क्यांचा माराही केला. त्यामुळे संशयितांनी तेथून पळ काढला. घटनेनंतर शिंदे यांनी ज्येष्ठाला पाणी दिले. तसेच त्यांच्या मुलास फोन करून बोलावून घेतले. त्यानंतर ज्येष्ठ नागरिक लागलीच मुलासोबत घरी गेले. त्यामुळे त्यांचे नाव कळू शकले नाही. भरदुपारी घडलेल्या या घटनेमुळे शहरातील ज्येष्ठांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न पुन्हा चव्हाट्यावर आला आहेत. दरम्यान, शहरात घडलेल्या या घटनेची पोलिसांत नोंद नसल्याचे सूत्रांनी सांगितले.



