रासायनिक खतांची भाववाढ नियंत्रीत करा : विनोद गायकवाड
अखिल भारतीय उपभोक्ता उत्थान संघटनेची मागणी : जिल्हाधिकार्यांना निवेदन सादर
भुसावळ : रासायनिक खतांच्या प्रचंड भाववाढीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. शासन, प्रशासनाने यांची गांभीर्याने दखल घेऊन शेतकर्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी अखिल भारतीय उपभोक्ता उत्थान संघटनेचे महाराष्ट्र सचिव प्राचार्य विनोद गायकवाड, ग्राहक संरक्षण कक्ष प्रमुख मनोज पवार यांनी केली आहे. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी व इतर संबंधितांना पाठवण्यात आले. कोरोना महामारी व कडक लॉकडाऊनमुळे शेतकरी, शेतमजूर, किरकोळ व्यावसायीक, सर्वसामान्य जनता आधीच मेटाकुटीला आली आहे. असे असताना यावर्षी सर्व रासायनिक खतांच्या, बियाण्यांच्या किंमती दिडपटीने वाढल्या आहेत. ही भाववाढ अन्यायकारक असल्याचे मत प्राचार्य गायकवाड यांनी व्यक्त केले.
शासन व जिल्हा प्रशासनाने अंकुश ठेवावा
निवेदनाचा आशय असा की, केंद्रीय खत व रसायन मंत्री यांनी यावर्षी कुठलीही भाववाढ होणार नसल्याचे जाहीर केले होते. तथापी, डीएपी खतांचे भाव एक हजार 200 रुपयांवरून एक हजार 900 झाले. 12-32-36 हे खत क हजार 175 ऐवजी एक हजार 800 रुपयांना विकले जात आहे. खत उत्पादक कंपन्यांनी एकीकडे खतांचे भाव वाढवले तर दुसरीकडे खत विक्रेत्यांचे कमिशन कमी केले आहे. परीणामी, यावर्षी जुने व नवीन खत यावरून व्यापारी शेतकर्यांची फसवणूकही करू शकतात. यासाठी शेतकर्यांनी परवानाधारक विक्रेत्यांकडूनच खत व विविध बियाणे खरेदी करताना त्याचे पक्के बिल घेणे गरजेचे आहे, असे आवाहनही दोन्ही संघटनांच्या पदाधिकार्यांनी केले आहे. दरम्यान, शेतकरी बांधवांनी पेरणीपूर्व घरचे सोयाबीन, कपाशीचे बियाणे वापरावे. तत्पूर्वी त्यांची उगवण क्षमता तपासावी. यावर शासन व जिल्हा प्रशासनाने अंकुश ठेवावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.



