रावेर बाजार समिती सभापतीपदी गोपाळ नेमाडे
रावेर : कृषी उत्पन्न बाजार समिती माजी मंत्री एकनाथराव खडसे गटाकडे गेल्याने पुन्हा राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. कोरोनामुळे लांबणीवर पडलेल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकांपूर्वीच रावेरची महत्वाची बाजार समिती खडसे गटाकडे गेली आहे. खडसे गटाचे निर्विवाद वर्चस्व आता रावेर बाजार समितीवर आहे. माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचा रावेर लोकसभा मतदारसंघात मोठा दबदबा आहे.भाजपातुन राष्ट्रवादीत आलेले खडसेंनी होमपीचवर निवडणूकांपूर्वी त्यांची ताकद दाखवायला सुरुवात केली आहे. आगामी वर्षभरात रावेर तालुक्यात पंचायत समिती, बाजार समिती, नगर पालिकांसारख्या महत्वाच्या संस्थेच्या निवडणुका होऊ घातले असतांना एकनाथराव खडसे यांचे कट्टर समर्थक असलेले गोपाळ नेमाडे यांची बाजार समितीच्या सभापतीपदी वर्णी लागली आहे.
कार्यकर्ता सभापती झाल्याचा आनंद : खडसे
रावेर बाजार समितीत माझा कार्यकर्ता सभापती झाला याचा मला आनंद आहे. नवनिर्वाचित सभापती गोपाळ नेमाडे व उपसभापती गोंडु महाजन दोघेही मला भेटायला येऊन गेले. गोपाळ नेमाडेसारखे अनेक कार्यकर्ते मला मानतात. सध्या ते भाजपात असले तरी ते माझे कार्यकर्ते आहेत. त्यांनी शेतकरी हिताचे कामे करावे.आगामी काळात शेतकरी हितासाठी माझी संपूर्ण ताकद त्यांच्या पाठीशी असेल.अशा भावना माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी ‘जनशक्ती’शी बोलतांना व्यक्त केल्या. दरम्यान माजी मंत्री एकनाथराव खडसे भाजपात असतांना 2016 मध्ये पुढाकार घेऊन सर्वपक्षीय पॅनल तयार करून आपले कार्यकर्ते निवडून आणले होते. मर्जीतले सभापती, उपसभापती रोटेशन पध्दतीने केले होते. सभापती गोपाळ नेमाडे व उपसभापती गोंडु महाजन यांनी आपले सहकारी डॉ.राजेंद्र पाटील व डी.सी.पाटील यांच्यासह माजी मंत्री खडसे यांची भेट घेऊन त्यांचा आशिर्वाद घेतला.


