भुसावळात पोलिसांच्या कोम्बिंगमध्ये तिघे वॉण्टेड जाळ्यात
भुसावळ : भुसावळातील गुन्हेगारी नियंत्रीत ठेवण्यासाठी पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या नेतृत्वात शुक्रवारी मध्यरात्रीनंतर शहर व बाजारपेठ पोलीस ठाणे हद्दीत कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात येवून गुन्हेगारांची झाडाझडती घेण्यात आली. त्यात वॉण्टेड तिघे गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात आल्या तर संशयास्पदरीत्या फिरणार्या चौघांना घेवून त्यांच्यावर भादंवि 122 प्रमाणे कारवाई करण्यात आली. तसेच रात्री उशिरापर्यंत हॉटेल सुरू ठेवल्याने एका हॉटेल चालकावर कारवाई करण्यात आली.
चार ट्रक चालकांना दंड
पोलिसांनी रात्री शहरातील विविध भागात नाकाबंदी केली. जामनेर रोड, पंधरा बंगला, बाजारपेठ पोलीस ठाणे समोर, गांधी पुतळा येथे रात्री 12 ते 4 या वेळात नाकाबंदी केल्यानंतर वाहनांची तपासणी करण्यात आली. पंधरा बंगला परिसरात सुध्दा वाहनांची गर्दी होताच पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांनी धाव घेतली. तेथे चार ट्रक मिळून आल्याने त्यांच्याकडून प्रत्येकी एक हजार रुपयांप्रमाणे दंड करण्यात आला. कोम्बिंगमध्ये सहा.पोलीस निरीक्षक अनिल मोरे, कृष्णा भोये, गणेश धुमाळ, एपीआय संदीप दुनगहू व शहर व बाजारपेठचे कर्मचारी सहभागी झाले होते.



गुन्ह्यात पसार असलेल्या संशयितांची तपासणी
पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली बाजारपेठचे पोलिस निरीक्षक दिलीप भागवत, शहरचे पोलीस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात अन्य अधिकारी व कर्मचार्यांच्या मदतीने शुक्रवारी रात्री 12 वाजता कोम्बिंगला सुरूवात केली. बाजारपेठ हद्दीतील वाल्मीक नगर, वैतागवाडी, खडकारोड, भारत नगर व अन्य भागातील रेकॉर्डवरील गुन्हेगार, तडीपार, चाकू, सुर्यांच्या गुन्ह्यातील संशयीत, वॉरंटमधील संशयित, वॉण्टेड आरोपी, दाखल गुन्ह्यात पसार असलेल्या संशयितांची तपासणी करण्यात आली. वॉण्टेड 18 पैकी तिघांना अटक करण्यात आली. हॉटेल प्रिमीयर मागे कृष्णा पन्नालाल धोबी तसेच आकाश बोदडे संशयीतरीत्या मिळून आला.

