अखेर अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीचा लागला शोध
यावल : येथील धोबीवाडा परिसरात राहणारी तथा मागील दीड वर्षापूर्वी शाळेतून अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीला उत्तर प्रदेश राज्यातून शोधुन ताब्यात घेण्यात यावल पोलिसांना अखेर यश मिळाले आहे. सविस्तर असे, भिमसिंग गंगाराम कोळी यांची नात ट्विंकल कोळी हिचे 19 नोव्हेंबर 2019 रोजी ती शिकत असलेल्या शाळेतून एका अज्ञात व्यक्तिद्वारे रिक्षात बसवुन तिचे अपहरण झाले होते. याच काळात तिची आई मनिषा कोळी ही सुप्रिम कॉलनी जळगाव येथे राहत असतांना तिचा शोध घेतल्यावर ती सापडून आली नाही. दरम्यान, भिमसिंग कोळी यांनी त्यांची नात ट्विंकल आणि त्यांची मुलगी मनिषा कोळीचा सर्वत्र शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या मिळून आल्या नव्हत्या. निराश झालेल्या आजोबांनी नातीसह त्यांची मुलीचा अखेर शोध थांबविला होता. मात्र, दीड वर्षानंतर अचानक ट्विंकल कोळी हिचा 24 एप्रिल रोजी सकाळी 4 वाजता आजोबांना फोन आला. तिने आपण कुठे आहे ही सर्व माहिती आजोबांना दिली. त्यानंतर यावल पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून त्या 13 वर्षीय अल्पवयीन मुलीच्या शोध कार्यासाठी पोलीस उपनिरीक्षक विनोद खांडबहाले आणि सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे या दोन सदस्यांच्या पथकास गोरखपूर (उतरप्रदेश) येथे पाठविले होते. उ.प्र.च्या बडहलगंज, जि.गोरखपूर येथील पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी बच्चा यादव, पोलीस कर्मचारी सुशीलकुमार यादव आणि गृहरक्षक दलाचे प्रदुमल कुमार या पोलिसांच्या मदतीने अपहरण केलेल्या मुलीचा सुखरूप शोध लावण्यात यश मिळवून तिला ताब्यात घेतले आहे. ट्विंकलची आई मनिषा हिचा एक महिन्यापूर्वी बडलहगंज येथे उपचार घेत असतांना कोरोनामुळे मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.




