भुसावळात स्टेडीयमसाठी आरक्षीत जागेवर उभारले ‘ग्रीन स्पेस उद्यान’
अडीच कोटींचा खर्च ; कामाला दोनवेळा मुदतवाढ देवूनही दंडाची झाली नाही आकारणी : तक्रारीची मुख्यमंत्र्यांकडून दखल -दिनेश उपाध्याय
भुसावळ : शहरात अमृत अभियानांतर्गत पालिका हद्दीतील सतारे शिवारातील नगररचना क्रमांक दोनमधील आरक्षण क्र.23 च्या भूखंडावर स्टेडियम आरक्षित असतानाही तेथे ग्रीन स्पेस उद्यान उभारण्यात आले व या कामासाठी दोन कोटी 50 लाख 44 हजारांची निविदा काढण्यात आली मात्र ही निविदा नियमबाह्य असल्याची तक्रार शहरातील माहिती अधिकार कार्यकर्ते दिनेश उपाध्याय यांनी जिल्हाधिकारी, पालिका मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांच्यासह मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. या तक्रारीची मुख्यमंत्री कार्यालयाकडून दखल घेण्यात आली असल्याचे उपाध्याय यांनी कळवले आहे.
आरक्षित जागेवर उद्यान निर्मितीचे काम
पालिकामार्फत हरीत क्षेत्र विकासाचे काम करण्यात आले. त्यात स्टेडियमचे आरक्षण असलेल्या भूखंडावर उद्यान निर्मितीचे काम शासनाच्या नियमांना बगल देऊन झाले. या कामासाठी पद्मालय कन्स्ट्रक्शन (जळगाव), अनिकेत ग्रो (पुणे), संजय हॉर्टीकल्चर (अकोला) या तीन कंपन्यांच्या निविदा आल्या. यापैकी पद्मालय कन्स्ट्रक्शनला दोन कोटी 50 लाख 44 हजार 181 रुपयांमध्ये काम देण्यात आले. या कामाला दोनवेळा मुदतवाढ देण्यात आली. ही मुदतवाढ देताना दंडाची आकारणी करण्यात आलेली नाही.निविदा प्रक्रियेत जॉगिंग पार्क नसतानादेखील पालिकेने त्याचा अट्टहास धरला. यानंतर देखरेखीअभावी या ग्रीन स्पेसची प्रचंड वाताहत झाली. या जागेवर स्टेडियमचे आरक्षण असताना तिथे हरीत क्षेत्रांतर्गत विकास करण्याची परवानगी दिली कोणी? तसेच निविदा प्रकियेत सहभाग घेतलेल्या फर्मची चौकशी व्हावी, अशी मागणी उपाध्याय यांनी केली आहे. या प्रकरणी न्यायालयात दाद मागणार असल्याचे उपाध्याय यांनी जिल्हाधिकारी, मुख्याधिकारी तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केलेल्या तक्रारीत नमूद केले आहे.



