बंदी असलेल्या एचटीबीटी कापूस बियाण्याची विक्री : बियाणे विक्रेत्याचा परवाना रद्द


जळगाव : शासन मान्यता नसलेले व विक्रीस बंदी असलेले अनधिकृत एचटीबीटी कापूस बियाण्याची विक्री करणार्‍या अमळनेरच्या कारंजा चौकातील मे.श्रीकृष्ण ग्रो व इरिगेशनचा परवाना रद्द करण्यात आला आहे. जळगाव जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक अरुण श्रीराम तायडे यांनी सहकार्‍यांसोबत सापळा रचून पाच हजार रुपये किंमतीचे पाच कापूस बियाणे पाकिटे जप्त केले होते. या प्रकरणी मे. श्रीकृष्ण ग्रो व इरीगेशनचे मालक जितेंद्र दिनकर पाटील (अमळनेर) यांच्याविरुद्ध सरकारतर्फे बियाणे नियम 1968 व पर्यावरण (संरक्षण) अधिनियम, 1986 नुसार अमळनेर पोलीस स्टेशन येथे 18 मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याची दखल घेत जितेंद्र पाटील यांचा बियाणे परवाना 25 मे 2021 पासुन कायमस्वरुपी रद्द करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी पत्रकान्वये दिली.

…तर साधावा कृषी विभागाशी संपर्क
एचटीबीटी या अवैध कापूस बियाण्यापासून पर्यावरणास असलेला धोका, जमिनीची सुपीकता नष्ट होण्याचा धोका, नागरीकांच्या अन्न सुरक्षेला असलेला धोका विचारात घेता खरीप हंगाम 2021 मध्ये कोणत्याही परिस्थितील शेतकरी बांधवांनी या वाणांची लागवड करु नये तसेच या वाणाचे अवैधरीत्या खरेदी करूनय व अशा कापूस वाणांची अनधिकृतपणे विक्री करीत असल्याचे दिसून आल्यास कृषी विभागाशी 0257-2239054 या क्रमांकावर माहिती द्यावी, असे आवाहन ठाकूर यांनी केले आहे.



 



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !