चिनावल तालुका वैद्यकीय कार्यालय स्थलांतराचा घाट


रावेर पंचायत समितीत भुवया उंचावणारा ठराव संमत

सावदा : रावेर तालुक्यातील चिनावल येथील रावेर तालुका वैद्यकीय अधिकारी कार्यालय स्थलांतर करण्याचा घाट रावेर पंचायत समितीकडून घालण्यात आला आहे. रावेर येथे कोणत्याी सोयी-सुविधा नसतांना ऐन कोरोना काळात काही पंचायत समिती सदस्यांनी तालुका वैद्यकीय कार्यालयाची पळवा-पळवी चालवली आहे. या पळवा-पळवीला नागरीकांनी विरोध दर्शवला आहे. तालुका स्तरावर वैद्यकीय अधिकारी कार्यालय हवे, अशी मागणी पंचायत समिती सदस्यांनी केली व तसा ठरावही पंचायत समिती बैठकीत संमत करण्यात आला होता परंतु आजच रावेर येथे कार्यालयासाठी वा लसीसाठी सोयी सुविधा नसल्याने कार्यालय हलवणे सोयीचे ठरणार नसल्याचे आरोग्य विभागाच्या कर्मचार्‍यांनी सांगितले आहे. तालुका वैद्यकीय कार्यालय तालुक्याच्या आरोग्य सुविधेच्या दृष्टीकोनातुन मध्यभागी असल्याने सात प्राथमिक आरोग्य केंद्रांपैकी दोन ऐनपूर व वाघोड रावेरनजीक आहेत तर उर्वरीत पाच आरोग्य केंद्र खिरोदा, चिनावल, लोहारा, थोरगव्हाण, निंभोरा हे चिनावलला येण्यासाठी सोयीचे आहेत शिवाय येथून विविध वैद्यकीय साहित्य, लशीची ने-आण करता येते त्यामुळे चिनावलहून तालुक्याचा कार्यभार पाहणे सोयीचे ठरत आहे. बालकांच्या व गरोदर मातांच्या दिल्या जाणार्‍या लसींची साठवणूक करण्यासाठी आय.एल.आर व डिप फ्रिजर याचे +2 ते +8 याच तापमानात प्राथमिक आरोग्य केंद्र, चिनावल येथे होते व तापमानाची देखरेख चिनावल प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी करतात.

पंचायत समिती सदस्यांचे उशिराचे शहाणपण
रावेर तालुक्यातील पंचायत समिती सदस्यांनी वैद्यकीय अधिकारी यांचे कार्यालय हलवण्याचा ठराव संमत करून घेतला असून कार्यालय हलवण्याची तशी हालचाल सुरू आहे. कोरोना काळात ग्रामीण भागातील कोरोना लसीची वाटप चिनावल येथील वैद्यकीय कार्यालयातूनच केली जात आहे. आत्ताच कार्यालयाची हालचाल केल्यास या सर्व बाबींची उपायोजना करावी लागणार आहे फक्त जागा उपलब्ध झाली म्हणून सर्व काही आलबेल होणार नाही. गेल्या कित्येक वर्षापासून तालुका वैद्यकीय अधिकारी कार्यालय ही चिनावल येथेच आहे. एवढ्या काळात कधीही पंचायत समिती सदस्यांना हे शहाणपण सुचलं नाही. वैद्यकीय कार्यालयाकडून तालुक्यातील सर्व प्रकारची कामे नियमित व व्यवस्थितरीत्या पार पडत असतात कोणतीही तक्रार कार्यालयाची नाही शह-काटशहाच्या राजकारणामुळे तर पंचायत समिती सदस्य तालुक्यातील नागरिकांच्या जीवाशी खेळत आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.



तर व्यापक जनआंदोलन : कमलाकर पाटील
चिनावल येथील तालुका वैद्यकीय कार्यालय रावेर येथिल पंचायत समितीजवळील हॉलमध्ये हलवण्याच्या हालचाली सुरू आहेत. चिनावल वैद्यकीय तालुका कार्यालय अंतर्गत तालुक्यात सात आरोग्य केंद्र असून चिनावल आरोग्य केंद्राच्या सात ते नऊ किलोमीटर परीसरात खिरोदा.लोहारा, निंभोरा, थोरगव्हाण, चिनावल असे पाच आरोग्य केंद्र आहेत व सोयीचे आहेत. असे असताना 25 किलोमीटर अंतरावर केंद्र नेण्याचा घाट कशासाठी असा प्रश्न आहे. चिनावल तालुका वैद्यकीय कार्यालय हालवण्याचा घाट हाणून पाडण्यासाठी जनअंदोलन करण्यात येईल, असा इशारा कोचूरचे कमलाकर रमेश पाटील यांनी दिला आहे.

सेवा अव्याहत : श्रीकांत सरोदे
कोरोना काळात चिनावल रावेर तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्या कार्यालयातून नागरीकांची सेवा अव्याहतपणे चालू आहे. आजपर्यंत कुठल्याही प्रकारची अडचण तालुक्यातील नागरीकांना आलेली नाही मग चिनावल येथील टी एम ओ कार्यालय हलवण्याची गरज काय ? असा प्रश्‍न चिनावलचे श्रीकांत सरोदे यांनी उपस्थित केला आहे.

कोरोना काळात स्थलांतर अयोग्य : गोपाळ नेमाडे
चिनावल येथील वैद्यकीय अधिकारी कार्यालय रावेर येथे स्थलांतरासाठी पंचायत समितीच्या मासिक सभेत ठराव संमत करण्यात आला परंतु सध्या कोरोना काळ आहे त्यामुळे पंचायत समितीने वैद्यकीय अधिकारी कार्यालय चिनावलाच राहू द्यावे, अशी अपेक्षा रावेर कृउबा सभापती गोपाळ नेमाडे म्हणाले.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !