भुसावळात पाचही केंद्रांवर समान लस पुरवठा करा


दिनेश उपाध्याय यांची आरोग्य मंत्र्यांकडे मागणी

भुसावळ : पालिका प्रशासनाने राजकीय दबावातून बद्रीप्लॉट व वरणगावरोड केंद्रात लसपुरवठा बंद केला असून यामुळे तीन केंद्रांवरच गर्दी होत आहे. शहरातील सर्व केंद्रांवर समप्रमाणात लसींचा साठा मिळावा तसेच राजकीय दबावात पुरवठा थांबविणार्‍या अधिकार्‍यांची चौकशी करावी, अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते दिनेश उपाध्याय यांनी जिल्हाधिकारी व आरेाग्य मंत्र्यांकडे केली आहे.

शहरात तीन केंद्रावरच लसीकरण
शहरात सध्या पाच ऐवजी केवळ तीन केंद्रावरच लसीकरण होत आहे. बद्री प्लॉट व वरणगावरोड केंद्रावर यापूर्वी लसीकरण सुस्थितीत सुरू असतानाही तेथे लसींचा पुरवठा दिला जात नाही. यामुळे सध्या तीन केंद्रांवर गर्दी होत आहे. शासनाने भौगोलिक समतोल साधून शहरात विविध पाच ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र उभारणी केली. याच आरेाग्य केंद्रातून लसीकरण केले जाते. मग यामध्ये काही नगरसेवकांच्या दबावातून विशिष्ट केंद्रांना लसींचा पुरवठा का व कसा बंद होतो? असा सवाल करीत या दोन्ही केंद्रावरील लसींचा पुरवठा बंद करण्यासाठी अधिकार्‍यांवर दबाव आणणार्‍या नगरसेवकांवर गुन्हे दाखल करावे तसेच संबंधीत अधिकार्‍यांची चौकशी करावी. शहरात पूर्वीप्रमाणे पाचही केंद्रांवर समान न्याय तत्वाने लस उपलब्ध करून द्यावी. नगरपरीषद प्रशासनाला शासनाकडून कोरोना लसीचे व वाटप करण्यात येतात ते शहरातील पाच केंद्रांवर समप्रमाणात उपलब्ध करून देण्यात यावी जेणेकरून शहरातील प्रत्येक भागातील लोकांना त्यांच्या प्रभागांमध्ये किंवा कमी अंतराचा प्रवास करून लस उपलब्ध होईल, अशी मागणीही दिनेश उपाध्याय यांनी केली आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !