अवकाळीचा पुन्हा फटका : पाल, गुलाबवाडी परिसरात केळीचे नुकसान
रावेर : तालुक्यातील पाल, गुलाबवाडी परिसरात वादळी पावसाच्या तडाख्यामुळे शेती शिवारातील केळी बागांचे नुकसान तसेच घराचे पत्रे उडाल्याने कुटुंब उघड्यावर आले होते. शनिवारी मध्यरात्रीदेखील जोरदार पावसाने हजरी लावली. शनिवारी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनीदेखील भेट देऊन शेतकर्यांना मदत करणार असल्याचे आश्वासन दिले. रविवारी, 30 मे रोजी उद्योजक श्रीराम पाटील, माजी आमदार मनीष जैन यांनीही बाधीत भागाची पाहणी केली. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकर्यांना मदत दिली जाईल, असे आश्वासन त्यांनी पाहणीनंतर शेतकर्यांना दिले होते. संबंधितांना तात्काळ पंचनामा करण्याचे आदेश दिले.
यांची होती उपस्थिती
यावेळी आमदार चंद्रकांत पाटील, जिल्हा उपप्रमुख प्रल्हाद महाजन, तालुका प्रमुख योगीराज पाटील, ज्येष्ठ कार्यकर्ते छोटू पाटील, संघटक अशोक शिंदे, तहसीलदार उषाराणी देवगुणे, बीडीओ दीपाली कोतवाल, वीज महावितरणचे उप कार्यकारी अभियंता प्रभुचरण चौधरी यांच्यासह पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.



तीन दिवसात वीजपुरवठा सुरळीत होणार
वीजा तीन दिवसात सुरळीत करण्याचे आदेश वीज कंपनीला देण्यात आले आहेत. तसेच पूर्ण पंचनामे झाल्यावरच मदतीबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. घरांना अंशतः मदत देण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. केळीच्या नुकसानीचे पूर्ण पंचनामे करण्याबाबत तालुका कृषी अधिकारी यांना पाहणीवेळी पालकमंत्री पाटील यांनी सूचना दिल्या आहेत.
आदिवासी पट्ट्यात सुमारे एक कोटींचे नुकसान
दरम्यान, पाल मोरव्हाल जिन्सी पट्ट्यात शनिवारी झालेल्या वादळी पावसामुळे 70 शेतकर्यांचे सुमारे एक कोटीचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. तसेच अनेक घरांचे पत्रे उडाले आहे. सर्वांचे पंचनामे करण्याचे तहसीलदार उषाराणी देवगुणे यांनी आदेश दिले आहे. दरम्यान, नुकसानसंदर्भात माध्यमांना माहिती देण्यास महसूलकडून वारंवार टाळाटाळ होते. याकडे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी
लक्ष घालावे, अशीही अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
फाउंडेशनतर्फे उद्योजक श्रीराम पाटील करणार मदत
रावेर तालुक्यात वादळी-पावसामुळे झालेल्या बाधित शेतकर्यांना श्रीराम फाउंडेशन शेतीसाठी लागणार्या वस्तूंना डिस्काउंट देऊन मदत करणार आहे. नुकसान भागाची उद्योजक श्रीराम पाटील यांनी रविवारी पाहणी केली. त्यांनी रेंभोटा, शिंगाडी, धामोडी परिसरातील
शेतकर्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शासनाने हेक्टरीप्रमाणे भरीव मदत करण्याची मागणी केली. यावेळी त्यांच्यासोबत पंचायत समिती सदस्य दीपक पाटील, घनश्याम पाटील, रवींद्र पाटील, देवलाल पाटील आदी उपस्थित होते.

