भुसावळात पावणेदोन महिन्यानंतर बाजारात उसळली गर्दी
भुसावळात लॉकडाऊन शिथील होताच गर्दीने गाठला उच्चांक ; खरेदीसाठी ग्राहकांची उडाली झुंबड
भुसावळ : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या निर्बंधामुळे बंद सुमारे 56 दिवसांपासून बंद असलेली बाजारपेठ सोमवारी खुली होताच विविधांगी वस्तुंच्या खरेदीसाठी शहरातील बाजारपेठेत ग्राहकांची गर्दी उसळली. जिल्हाधिकार्यांनी सोमवार ते शुक्रवारी नॉन इसेन्शीयल दुकाने सुरू ठेवण्यासाठी सकाळी सात ते दुपारी दोन वेळेत परवानगी दिल्याने व्यापार्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.
दुकाने खुली होताच व्यापार्यांमध्ये उत्साह
जिल्हा प्रशासनाने निर्बंध शिथील केल्याने लॉकडाऊनमुळे त्रस्त झालेल्या व्यापार्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. प्रशासनाच्या निर्णयामुळे मंगळवारी बाजारपेठेतील सर्व दुकाने सकाळपासून सुरु असल्याचे दिसून आले. तब्बल 57 दिवसानंतर बाजारपेठ सुरू झाल्याने झाल्याने व्यापार्यांचा उत्साह दिसून आला. भाजी बाजारासह सराफा बाजार, कापड दुकाने, इलेक्ट्रॉनिक्स शोरुमसह विविध दुकाने दुपारी दोन वाजेपर्यंत सुरू होती. स्वतंत्र ठिकाणी असलेली सर्व दुकाने सोमवार ते शुक्रवार सकाळी नऊ ते दुपारी या वेळेत सुरू ठेवण्याचे जिल्हाधिकार्यांचे आदेश दिले आहेत.



नागरीकांच्या गर्दीने रस्ते झाले फुल्ल
शहरातील प्रमुख चौकात फेरफटका मारला असता, डिस्को टॉवर, अप्सरा टॉवर, मरीमाता मंदिर रोड, बडी मशीद, गांधी चौक, मॉडर्न रोड, डेली मार्केट, जामनेर रोड परीसरातील प्रमुख रस्त्यांवर मोठी लगबग दिसून आली. प्रशासनाने लॉकडाऊनमुळे बरीच शिथीलता दिली आहे. शहरातील व्यावसायीकांनी तब्बल दीड महिन्यानंतर नव्याने सुरूवात केली आहे. त्यामुळेे शहरातील रस्त्यावर विविध वस्तूंच्या खरेदीसाठी नागरीकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती.
गर्दीमुळे कोरोनाचा धोका वाढण्याची शक्यता
बहुतांश नागरीकांनी मास्कचा वापर टाळला तर सोशल डिस्टन्सिंगचा पुर्णपणे फज्जा उडाला असून कोरोना गेला की काय? असा प्रश्न अनेकांना पडला होता. नागरीकांना शासनाने सवलत दिली असलीतरी नागरीकांनी मात्र नियमांचे पालन होत नसल्याने कमी झालेली कोरोना रुग्णांची संख्या त्यामुळे वाढण्याची भीती आहे. प्रशासनाकडून या गर्दीबद्दल योग्य तो सकारात्मक पुन्हा निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा नागरीकांकडून होत आहे.

