चिमुकल्यांसाठी सुपर स्पेशालीटी बेड निर्माण करा
भुसावळ शहर शिवसेनेची मागणी ग्रामीण वैद्यकीय अधीक्षकांकडे मागणी
भुसावळ : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लहान मुलांना होण्याची शक्यता लक्षात घेता त्यांच्यासाठी सुपर स्पेशालिटीबेड ग्रामीण रुग्णालयात राखीव ठेवण्यात यावे, अशी मागणी भुसावळ शिवसेनेचे शहरप्रमुख बबलू बर्हाटे यांनी केली आहे. ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य अधिकारी डॉ.मयूर चौधरी, डॉ. विक्रांत सोनार यांच्याशी चर्चा करतांना त्यांनी अनेक विषय मांडले. आतापर्यंत कोरोनाच्या पहिल्या आणि दुसर्या लाटेत 45 वयांपेक्षा रुग्णांना बाधा व मृत्यू झाले मात्र आता त्यापेक्षा कमी वयाचे बाधीत व मृत्युमुखी पडत आहेत. या तिसर्या लाटेत 18 वर्षांपेक्षा कमी असलेल्या युवक, बालकांना विषाणूचे संक्रमण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यावर तातडीने उपाय योजना करणे आवश्यक असल्याचे बर्हाटे म्हणाले.
या विषयांवर झाली चर्चा
प्रसंगी बबलू बर्हाटे यांनी केंद्रात 0 ते 1 या वयोगटातील नवजात बालकांसाठी 20 खाटा राखीव ठेवाव्यात, नवजात बालकांसोबत मातेला स्तनपानसाठी केंद्रावर वेगळा कक्ष असावा. कोरोनाबाधीत बालक व युवकांवर उपचाराची एकच पद्धत असावी आणि डॉक्टर व आरोग्य कर्मचार्यांना त्यानुसार प्रशिक्षितही करण्यात यावे, बालरोग व इतर तज्ज्ञांचा तातडीने टास्क फोर्सचे गठण करण्यात यावे, संक्रमित बालकांसाठी सकस आहाराची व्यवस्था करण्यात यावी आदी मागण्यांवर चर्चा केली. दरम्यान, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लहान बालकांना होण्याची शक्यता पाहता या अनुषंगाने उपाय योजनांसाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा करणार असल्याचे शहरप्रमुख बबलू बर्हाटे कळवतात.



