वरणगावातील शिवभोजन केंद्रात गरजूंची भागतेय भूक


वरणगावात एकाच महिन्यात चार हजार गरजूंनी घेतला लाभ

वरणगाव : राज्यात लॉकडाऊन करण्यात आल्यानंतर हातमजूरांचे रोजगार बंद पडले व अशा कठीण परीस्थितीत त्यांची उपासमार होऊ नये, यासाठी राज्य सरकारने शिवभोजन थाळी केंद्र सुरू केले. वरणगाव येथील बसस्थानक चौकात मे महिन्यात सुरु झालेल्या शिवभोजन थाळी केंद्राच्या माध्यमातून पहिल्याच महिन्यात तीन हजार 750 गरजूंनी थाळीचा लाभ घेतला.

महाराष्ट्र दिनी झाले उद्घाटन
वरणगावात शहरात महाराष्ट्र दिनी शिवभोजन थाळी केंद्राचे उद्घाटन ाले होते. पहिल्याच महिन्यातच या शिवभोजन थाळी केंद्राच्या माध्यमातून अनेकांची भूक भागली आहे. वरणगाव व परीसरातील गोरगरीब कष्टकरी आणि हातावर पोट भरणार्‍या नागरीकांसाठी हे शिवभोजन थाळी केंद्र मोठा दिलासादायक ठरत आहे. बसस्थानक चौकात हॉटेल अमृततुल्य येथे दुपारी 12 ते 2 या वेळेत शिवभोजन थाळी केंद्रावर लांब रांग लागते. या ठिकाणी दररोज 125 गरजूंना शिवभोजन थाळीचे वाटप केले जात असल्याची माहिती शिवभोजन केंद्र संचालक संतोष माळी यांनी दिली.



थाळी वाढविण्याची मागणी
वरणगावसाठी शिवभोजन थाळी केंद्रावर शासनाकडून फक्त 100 थाळीला परवानगी दिली आहे. आम्ही दररोज 125 थाळी वाटप करतो. शहराची लोकसंख्या 50 हजारांच्या जवळपास आहे. ही लोकसंख्या लक्षात घेता थाळी संख्या वाढवून मिळावी, अशी मागणी केंद्र संचालक आणि लाभार्थी यांच्याकडून होत आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !