40 वर्षानंतर उजळणार सिद्धेश्वर नगर रस्त्याचे भाग्य : आश्वासनानंतर उपोषण अखेर मागे
वरणगाव : महात्मा गांधी विद्यालय ते सिद्धेश्वर नगरापर्यंतच्या रस्त्याचे काम तातडीने सुरू करण्याच्या मागणीसाठी सिद्धेश्वर नगरात नागरीकांनी शनिवारी उपोषण छेडले होते. राष्ट्रवादी पदाधिकारी राजेंद्र विश्वनाथ चौधरी यांनीदेखील उपोषणाकर्त्यांची भेट घेतल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता कुरेशी यांच्याशी चर्चा केली व त्यांना उपोषणस्थळी येण्याची विनंती केल्यानंतर त्यांनी उपोषणकर्त्यांशी यशस्वी चर्चा केली व कामाची वर्क ऑर्डर दाखवून लवकरच कामास सुरूवात करीत असल्याची ग्वाही दिल्याने उपोषण मागे घेण्यात आले.
40 वर्षांपासून रस्ता दुरुस्तीची मागणी
गेल्या 40 वर्षांपासून सिद्धेश्वर नगरवासी रस्त्याची मागणी करीत असून केवळ आश्वासन देवून वेळ मारून नेली जात असल्याने निलेश एकनाथ काळे व सिद्धेश्वर नगर वासीयांनी 4 रोजी तहसील प्रशासनाला उपोषण करीत असल्याबाबत निवेदन दिले होते. पावसाळा तोंडावर असल्याने तातडीने काम सुरू करण्याची मागणी प्रसंगी नागरीकांनी केली होती.

या नागरीकांनी छेडले उपोषण
उपोषणात दीपक कोळी, दीपक पाटील, दीपक काळे, हर्षल वंजारी, प्रकाश माळी, रोहित माळी, ज्ञानेश्वर माळी, रूपेश कोळी, सखाराम माळी, गजेंद्र वंजारी, सुनील धनगर, मनोज भोई, गौरव माळी, जितेंद्र मराठे, अरुण माळी, मयूर मराठे, पिंटू कोळी, कौतीक माळी, किशोर काळे आदी सहभागी झाले होते.
राष्ट्रवादी पदाधिकार्यांची भेट
उपोषणस्थळी राष्ट्रवादी गटनेते राजेंद्र विश्वनाथ चौधरी यांनी भेट दिल्यानंतर त्यांनी उपोषणकर्त्यांशी चर्चा केली. याप्रसंगी चौधरी यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता कुरेशी यांच्याशी दूरध्वनीवरून रस्ता कामाबाबत चर्चा केल्यानंतर त्यांनी उपोषणस्थळी भेट द्यावीख, अशी विनंती केली. त्यानंतर कुरेशी यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली व त्यांना रस्ता काम मंजूर झाल्याची वर्क ऑर्डर दाखवून लवकरच महात्मा गांधी विद्यालय ते सिद्धेश्वर नगर येथे जाणार्या रस्ता रस्त्याच्या कामाला सुरूवात केली जाणार असल्याचे लेखी आश्वासन दिल्याने उपोषणकर्त्यांनी उपोषण मागे घेतले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपजिल्हाध्यक्ष राजेंद्र विश्वनाथ चौधरी, तालुकाध्यक्ष दीपक हरी मराठे, सुधाकर बळीराम जावळे, माजी नगरसेवक गणेश धनगर, शिवसेना जिल्हाप्रमुख समाधान महाजन, विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन कैलाश माळी, महेश सोनवणे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

