बोरखेडा हत्याकांड : आरोपीच्या जामिनावर 18 रोजी पुढील सुनावणी
भुसावळ : रावेर-बोरखेडा रस्त्यावरील रखवालदार आदिवासी कुटुंबातील चार अल्पवयीन भावंडांची कुर्हाडीच्या सहाय्याने निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना 16 ऑक्टोबर 2020 रोजी उघडकीस आली होती. रावेर पोलिसांनी या खून खटल्याप्रकरणी दोषारोपपत्र सादर केल्यानंतर भुसावळ अतिरीक्त सत्र न्यायालयात शुक्रवार, 11 रोजी खटल्यातील आरोपी महेंद्र बारेला (22) च्या जामिनावर कामकाज झाले. आरोपीतर्फे अॅड.एस.आर.पाल यांनी मुंबई व नागपूर न्यायालयाच्या दाखल्यांचा संदर्भ देत आरोपीला जामीन देण्याची मागणी केली तर विशेष सरकारी वकील अॅड.उज्ज्वल निकम यांनी सरकारतर्फे बाजू मांडत जामिनाला तीव्र विरोश दर्शवला. आरोपीने गुन्हा कबुल केला असून तो बाहेर आल्यास साक्षीदारांवर दबाव टाकेल, असे त्यांनी सांगत जामिनाला विरोध दर्शवला. दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकल्यानंतर न्या.एस.पी.डोरले यांनी या खटल्यात आता 18 जून ही सुनावणीची तारीख दिली आहे.




