भुसावळात माजी आमदार चौधरींविरोधात पालिका कर्मचार्यांची निदर्शने
अटक न केल्यास कामबंद आंदोलनाचा इशारा : शिविगाळ प्रकरणी संताप
भुसावळ : शहरातील टिंबर मार्केटमधील बेकायदा बांधकामाची पाहणी करण्यासाठी गेलेल्या मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांना भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी यांनी अर्वाच्च शब्दात शिवीगाळ केल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली होती. या प्रकरणी मुख्याधिकार्यांच्या फिर्यादीवरून चौधरी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला मात्र त्यांना अटक करण्यात न मंगळवारी दुपारी पालिका अधिकारी व कर्मचार्यांनी पालिका कार्यालयाच्या आवारात निदर्शने करीत संतोष चौधरींच्या अटकेची मागणी केली. चौधरी यांना अटक न झाल्यास कामबंद करण्याचा इशारा देण्यात आला.
पालिका कार्यालयाबाहेर निदर्शने
मुख्याधिकार्यांवर करण्यात आलेल्या शिवीगाळ प्रकरणी माजी आमदार चौधरी यांच्या अटकेच्या मागणीसाठी पालिकेच्या अधिकारी व कर्मचार्यांनी मंगळवारी दुपारी पालिकेसमोर निदर्शने केली. यावेळी लेखाधिकारी विनोद चावरीया, कार्यालयीन अधीक्षक, महेंद्र कथोरे, लेखा परीक्षक अॅड.तृप्ती भामरे, लेखापाल सुदर्शन शमनानी, नगर रचनाकार शुभम खानकर, शेख परवेज, प्रशासकीय अधिकारी रामदास म्हस्के, चेतन पाटील, लोकेश ढाके, अनिल गवारे, संदीप पवार, वसंत राठोड आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.



