खंडाळा ग्रामपंचायतीमधील गैरव्यवहाराची चौकशी करा
दलित पँथरची गटविकास अधिकार्यांकडे निवेदनाद्वारे मागणी
भुसावळ : तालुक्यातील खंडाळा ग्रामपंचायत अंतर्गत दलित वस्ती सुधार योजना, स्वच्छ भारत मिशन तसेच 14 व्या वित्त आयोगाच्या निधीअंर्तगत गैरव्यवहार झाला असून, या कामांच्या चौकशीसाठी प्रशासानाकडे तक्रारी केल्या मात्र त्यावर कारवाई होत नसल्याने या प्रकरणी चौकशीला गती द्यावी, या मागणीसाठी मंगळवारी राष्ट्रीय दलित पँथरतर्फे गटविकास अधिकार्यांना निवेदन देण्यात आले.
निधी लाटण्यात आल्याचा आरोप
दलित पँथरने गटविकास अधिकार्यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले की, खंडाळा ग्रामपंचायतमध्ये सन 2015-2020 च्या कालावधीत खंडाळा गावात दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत सरपंच आणि ग्रामसेवक यांनी संगनमत करुन, दोन ते तीन वेळा एकाच ठिकाणी काँक्रीटीकरणाची रस्त्याची कामे दाखवली असून अंदाजपत्रक केले नसून यात गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे तसेच स्वच्छ भारत मिशन अंतर्गत तत्कालीन सरपंच, ग्रामसेवक यांनी बोगस लाभार्थी दाखवून तसेच मयतांंच्या नावे तसेच ज्यांनी अगोदरच शौचालय बांधलेले आहे अशा लोकांच्या नावे निधी लाटलेला आहे. दुसर्या योजनेतील केलेली कामे सुद्धा 14 व्या वित्त आयोगाच्या अंतर्गत दर्शविली आहेत. कोणत्याही प्रकारची चौकशी करण्यात आली नसून सन 2015-2020 या कालावधीत झालेल्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे. गटविकास अधिकारी विलास भाटकर यांना निवेदन देताना दलित पँथरचे सरचिटणीस सिद्धार्थ सोनवणे, जिल्हा सरचिटणीस व ग्रा प सदस्य प्रेमचंद सुरवाडे, जिल्हा सचिव सुभाष जोहरे, तालुका उपाध्यक्ष शरद सुरवाडे उपस्थित होते.



