दीपनगरातील तिन्ही संच बंद : वीजनिर्मिती ठप्प
भुसावळ : राज्यात विजेची मागणी कमी झाल्याने तसेच एमओडी म्हणजेच मेरिट ऑर्डर डिस्पॅचनुसार संचातून निर्मित विजेचे मूल्य वाढल्याने दीपनगरातील 1210 मेगावॅट क्षमतेचे सर्व तिन्ही संच बंद करण्यात आले. दीपनगर केंद्रात गेल्या 16 महिन्यांपासून बंद असलेला संच क्रमांक 3 उन्हाळ्यात सुरू केला होता. तर 500 बाय दोनच्या विस्तारीत प्रकल्पातूनही संच क्रमांक 4 आणि 5 मधून वीजनिर्मिती सुरू होती. मात्र, पावसाळ्याच्या सुरुवातीलाच शेती वापराच्या विजेची मागणी कमी झाली. यामुळे दीपनगरातील संच क्रमांक 4 आणि 5 हे दोन्ही 500 मेगावॅट क्षमतेचे संच एमओडीमध्ये आले. यामुळे लोड डिस्पॅच सेंटरने दिलेल्या निर्देशानुसार 500 मेगावॅट क्षमतेचे दोन व 210 मेगावॅट क्षमतेचा एक असे तिन्ही संच बंद करण्यात आले आहे.




