पहिल्याच पावसात भरले जलक्रांतीचे खड्डे : नागरीकांना सावधानतेचा इशारा
फैजपूर : गत पंधरवड्यात महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांच्या पुढाकाराने लोकसहभागातून येथील धाडी नदीपात्रामध्ये पाणी अडवण्यासाठी तीन मोठ-मोठे खड्डे करण्यात आले होते. हे खड्डे पहिल्याच पावसाच्या पाण्याने तुडुंब भरून वाहू लागल्याने शेतकर्यांसह सर्वांनी समाधान व्यक्त केले. मागील दोन वर्षांपूर्वी जलक्रांती अभियानांतर्गत केलेल्या खड्ड्यांमुळे परीसरातील शेतकर्यांना फायदा झाला व त्यांच्या विहिरींच्या पाण्याची पातळी वाढली होती. त्यावेळी हे खड्डे तीन वेळा पूर्ण भरून पाण्याचा जमिनीतील निचरा झाला. यंदादेखील प्रांत कैलास कडलग, सर्कल जे.डी. बंगाळे यांच्या पूर्व परवानगीने नगरपालिका पाणी शुद्धीकरण केंद्राच्या पाठीमागे तसेच स्मशाभूमी मागे धाडी नदीपात्रात खड्डा खोदकाम करण्यात आले. परीसरातील शेतकर्यांनी स्वयंस्फूर्तीने या कार्यात भाग घेऊन सहकार्य केले.
नागरीकांना सावधानतेचा इशारा
धाडी नदीपात्रात तीन ठिकाणी खड्डे खोदून पाणी अडवण्यात आले आहेत. या ठिकाणी खड्ड्यांची खोली जास्त असल्यामुळे नागरीकांनी जाऊ नये. गुरे-ढोरे तसेच बकर्या चराईस आणणार्यांनी काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनातर्फे महाराजांनी केले आहे.



