बोरखेडा हत्याकांड : आरोपीचा जामीन फेटाळला
भुसावळ : बोरखेडा हत्याकांडातील (Borkheda Hatyakand) आरोपीचा न्या.एस.पी.डोरले यांनी जामीन शुक्रवारी फेटाळला. 11 रोजी आरोपीला जामीन मिळण्याबाबत भुसावळ अतिरीक्त सत्र न्यायालयात अर्ज करण्यात आल्याने दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकल्यानंतर शुक्रवार, 18 रोजी याबाबत सुनावणी होणार असल्याचे न्या.डोरले यांनी आदेश दिले होते.
संशयीत आरोपी कारागृहातच
अत्याचाराचे बिंग बाहेर न येण्यासाठी एकाच कुटुंबातील चौघा भावंडांची हत्या (Borkheda Hatyakand) करण्यात आल्याची संतापजनक घटना रावेर तालुक्यातील बोरखेडा शिवारात 15 ऑक्टोबर 2020 रोजी घडली होती. या प्रकरणी न्यायालयात रावेर पोलिसांनी दोषारोपपत्र दाखल केले असून भुसावळ सत्र न्यायालयात खटल्याची सुनावणी सुरू आहे. हत्याकांडातील आरोपी महेंद्र बारेला (22) हा हत्याकांड घडल्याच्या दिवसापासून जळगाव कारागृहातच (Jalgaon Jail) आहे. शुक्रवार, 11 जून रोजी आरोपीतर्फे अॅड.एस.आर.पाल यांनी जामीन अर्ज न्या.डोरले यांच्या न्यायालयात दाखल केला असता आरोपीला जामीन मिळू नये म्हणून विशेष सरकारी वकील अॅड.उज्वल निकम यांनी जोरदार विरोध केला. शुक्रवार, 18 जून रोजी न्या.डोरले यांनी आरोपीचा जामीन फेटाळला असल्याचे सूत्रांनी सांगितले.



