मुक्ताईनगरात वृद्धावर प्राणघातक हल्ला : तिघे ताब्यात
मुक्ताईनगर : बर्हाणपूर रस्त्यावरील श्री हॉटेल समोर चौघे महिलेशी वाद घालत असताना वाद मिटवण्यासाठी पुढे आलेल्या वृद्धावर एकाने चाकूने हल्ला करण्यात आल्याची घटना रविवारी सकाळी साडेदहा वाजता घडली. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलिसात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यातील तिघांना ताब्यात घेण्यात आले.
चाकूने हल्ला : चौघांविरुद्ध गुन्हा
सागर ओंकार पाटील (32) यांच्या फिर्यादीनुसार श्री हॉटेलसमोर गोपाळ काठोके यांचे दुकान असून त्यांची आई शांताबाई काठोके या डबा घेऊन आले असता त्यांच्याशी रमजान खान अयुब खान (रा.गुलाबगंज, बर्हाणपूर मध्यप्रदेश), शाहरुख शेख आजम शेख (रा.भुसावळ), शिवम गोपाल ठाकूर (रा.शिवाजी नगर, बर्हाणपूर ) तसेच अनिल पहिलवान (पूर्ण नाव माहीत नाही) यांनी वाद घातला. यावेळी शेजारीच मोबाईलचे दुकान असलेल्या सागर ओंकार पाटील (32 वर्षे) व त्यांचे वडील ओंकार विठोबा पाटील (60) हे वाद मिटवण्यासाठी पुढे आल्यानंतर रमजान खान अयुब खान याने तुम्ही आमच्या वादात पडण्याचे कारण नाही. तुम्ही मध्ये बोललात तर तुम्हाला जीवे ठार मारू म्हणत आरोपीने खिशातून चाकू बाहेर काढत हल्ला केला तसेच इतर तीन संशयीत आरोपींनी सुद्धा फिर्यादी व त्यांचे वडील यांना मारहाण केली. ओंकार विठोबा पाटील यांच्या गळ्यावर व छातीवर वार करून आल्याने ते गंभीर जखमी झाले. तपास पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक परवीन तडवी करीत आहेत.



