प्रज्ञाचक्षू बांधवांना रस्त्यातील अडथळ्यांची मिळणार गॅझेट्सद्वारे माहिती
प्रा.धीरज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेलिकॉम विभागाच्या विद्यार्थीनींनी बनवला प्रकल्प
भुसावळ : प्रज्ञाचक्षू बांधवांना रस्त्यातील अडथळ्यांची गॅझेट्सद्वारे माहिती मिळणार आहे. अर्डिनो प्रणालीचा त्यासाठी वापर करण्यात आला असून यामुळे विसासायास आत्मविश्वासाने एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी जाता येणार आहे. . भुसावळच्या हिंदी सेवा मंडळ संचलित श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेलिकॉम शाखेतील अंतिम वर्षाच्या कोमल जाधव, धनश्री बर्हाटे, राजश्री बडगुजर या विद्यार्थिनींनी ‘द थर्ड आय फॉर द ब्लाइंड पीपल’ ही प्रणाली प्रा.धिरज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विकसित केली आहे.
पदाधिकार्यांनी केले कौतुक
हिंदी सेवा मंडळ अध्यक्ष जे.टी. अग्रवाल, सचिव मधुलता शर्मा, कोषाध्यक्ष एम.डी. तिवारी व पदाधिकारी तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.पी.सिंह, डीन डॉ.राहुल बारजिभे, विभागप्रमुख डॉ.गिरीष कुळकर्णी यांनी विद्यार्थीनींच्या या समाजोपयोगी प्रकल्पाचे कौतुक केले.



अत्यल्प खर्चात उत्पादन
इलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञानाचा वापरून अर्डिनो युनो, अडथळे शोधण्यासाठी एचसी एसआर 04 अल्ट्रासोनिक सेन्सर, डीसी मोटर,बझर, रेड एलईडी, स्विचेस, पॉवर बँक, हेडर पीन या सारख्या उपकरणांच्या मदतीने ही प्रणाली काम करणार आहे. डिझाइनसाठी कमी वेळ लागला व उत्पादन खर्चही कमी आहे. कमी वीज वापरासह हलके वजन असल्याने, अंध व्यक्ती हे यंत्र सर्वत्र ठिकाणी नेता येणार आहे.
पेटंटसाठी अर्ज करणार
ही प्रणाली वाटेत येणार्या अडथळ्यांना ओळखून (ध्वनिलहरी) लाटा तयार करतात आणि आवाज निर्माण होतो आणि समोर अडथळा आहे, असे लगेच सूचित होते. हे दृष्टिहीन लोकांना अडथळे ओळखून आरामात चालण्यास मदत करते. त्यांना फक्त हे डिव्हाइस परीधान करणे आवश्यक आहे. सध्या या प्रणालीच्या पेटंटसाठी अर्ज करण्यात येणार आहे. लवकरच काही बदल करून ती बाजारात आणण्याचा प्रयत्न आहे, असे मार्गदर्शक प्रा.धिरज पाटील यांनी सांगितले.
स्वयंरोजगाराचा मार्ग तयार केला
या प्रणालीबाबत कोमल जाधव हिने सांगितले, इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेलिकॉम शाखेत करीयर घडवून स्वयंरोजगाराचा मार्ग तयार केला आहे याचा आनंद वाटतो. प्रज्ञाचक्षू बांधवांना प्रवासात विशेषत: अपरीचीत ठिकाणी रस्ता नवखा असल्याने अडथळे येतात. त्यांना आम्ही विकासीत केलेली ही प्रणाली उपयोगी ठरणार आहे. अंध व्यक्तींना येणार्या अडचणी जाणून गरजेनुसार त्यात बदल करण्यात आले आहेत.

