मुक्ताईनगरात वृद्धावर हल्ला : चौथा पसार संशयीत जाळ्यात


मुक्ताईनगर : बर्‍हाणपूर रस्त्यावरील श्री हॉटेल समोर चौघे महिलेशी वाद घालत असताना वाद मिटवण्यासाठी पुढे आलेल्या वृद्धावर एकाने चाकूने हल्ला केल्याची घटना रविवार, 20 जून रोजी सकाळी साडेदहा वाजता घडली. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलिसात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यातील तिघांना अटक करण्यात आली होती तर चौथ्या पसार संशयीताला मंगळवारी अटक करण्यात आली. अनिल पहेलवान उर्फ अनिल अशोक सोनवणे (बर्‍हाणपूर) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

गोपनीय माहितीवरून अटक
श्री हॉटेलसमोर गोपाळ काठोके यांच्या दुकानावर शांताबाई काठोके यांच्याशी रमजान खान अयुब खान (रा.गुलाबगंज, बर्हाणपूर मध्यप्रदेश), शाहरुख शेख आजम शेख (रा.भुसावळ), शिवम गोपाल ठाकूर (रा.शिवाजी नगर, बर्‍हाणपूर) तसेच अनिल पहिलवान यांनी वाद घातला असता सागर ओंकार पाटील (32) व त्यांचे वडील ओंकार विठोबा पाटील (60) यांनी वाद मिटवण्याचा प्रयत्न केल्यानंतर आरोपींनी ओंकार विठोबा पाटील यांच्या गळ्यावर व छातीवर वार करून त्यांना गंभीर जखमी केले होते. या प्रकरणी तिघा आरोपींना अटक असलीतरी अनिल पहेलवान गर्दीचा फायदा घेत पसार झाला होता. संशयीतास बर्‍हाणपूरच्या लाल मिल चाळ परीसरातून मंगळवारी अटक करण्यात आली. ही कारवाई मुक्ताईनगर उपविभागीय पोलिस अधिकारी विवेक लावंड, मुक्ताईनगर पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक परवीन तडवी, पोलीस कॉन्स्टेबल मोतीलाल बोरसे, पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र मेढे, पोलीस कॉन्स्टेबल गोपीचंद सोनवणे आदींच्या पथकाने केली.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !