यावलला पोलीस अधीक्षकांच्या पथकाचा छापा : आठ जुगारी जाळ्यात
पाच लाख 76 हजारांचा मुद्देेमाल जप्त : कारवाईने उडाली खळबळ
यावल : शहरातील हडकाई नदीच्या पात्राजवळ जुगाराचा डाव सुरू असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या पथकाने मिळाल्यानंतर पथकाने छापा टाकत आठ जुगार्यांच्या मुसक्या आवळत 80 हजाराची रोकड, 14 दुचाकीसह सहा मोबाईल मिळून पाच लाख 76 हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याने अवैध धंदे चालकांच्या गोटात मोठी खळबळ उडाली. गेल्या काही वर्षात अवैध धंद्याविरोधात ही सर्वाधिक मोठी कारवाई मानली जात आहे.
आठ जुगारी जाळ्यात : लाखोंचा मुद्देमाल जप्त
हडकाई नदीपात्राजवळील बखळ जागेवरू बावन्न पत्त्यांचा डाव रंगलेला असताना मंगळवारी दुपारी चार वाजता पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांच्या आदेशान्वये वाचक सहा.निरीक्षक एस.एच.आखेगावकर, हवालदार प्रवीण पाटील, जमील अहमदखान, भूषण मांडोळे, रवींद्र पाटील, आसीफ पिंजारी, यावलचे उपनिरीक्षक जितेंद्र खैरनार, भूषण चव्हाण, सुशील घुगे, गणेश रोहिल यांच्या पथकाने छापा टाकत आठ जुगारींच्या मुसक्या आवळल्या. अटकेतील संशयीतांमध्ये विजय बंडू गजरे, शे.रसुल शे.लाल, कडू झांबरे, धीरज वारके, चंदू पारधे, शे.सलिम शे.फकीरा, विजय पाटील, रवींद्र भंगाळे यांचा समावेश आहे. संशयीतांकडून 80 हजारांची रोकड, 14 दुचाकी व सहा मोबाईल मिळून पाच लाख 76 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सुशील घुगे यांच्या फिर्यादीनुसार आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.



