भुसावळातील सर्वोदय छात्रालयात सुरक्षा रक्षक नेमला नाही : प्रमोद सावकारे
भुसावळ : शहरातील सर्वोदय छात्रालयात संस्थेने कोणताही सुरक्षा रक्षक नेमला नाही. यामुळे माजी आमदार संतोष चौधरींवर झालेल्या गुन्ह्यात तथाकथित सुरक्षा रक्षकाविरूद्धही गुन्हा दाखल व्हावा तसेच चौधरींच्या कॉल रेकॉर्डची माहिती घ्यावी, अशी मागणी सर्वोदय छात्रालयाचे अध्यक्ष प्रमोद सावकारे व सचिव रामदास सावकारे यांनी पोलिसांकडे केली आहे. टिंबर मार्केटमधील सर्वोदय छात्रालयावरील मिळकतीवर बेकायदेशीर अतिक्रमण व ताबा घेण्याचा प्रयत्न केला जात होता. या संदर्भात प्रशासनाकडे तक्रार अर्ज केला होता. त्यानुसार मुख्याधिकारी संदीप चिद्रवार हे चौकशीसाठी गेले होते. यानंतर चौधरींवर शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला.
कैलास शिरसाठ यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करा
अंतरीम जामिनानंतर चौधरींनी या ठिकाणावरुन सुरक्षारक्षक कैलास शिरसाठ याने फोन करून बोलावल्याने आपण तेथे गेलो, असे म्हटले आहे मात्र मुळात संस्थेने कोणताही सुरक्षा रक्षक ठेवलेला नाही. यामुळे कैलास शिरसाठ यांच्या विरुद्धही गुन्हा दाखल करावा तसेच मोबाईल कॉलचे डिटेल्स काढावे, अशी मागणी अध्यक्ष प्रमोद सावकारे, सचिव रामदास सावकारे यांनी बाजारपेठ पोलिसांकडे केली आहे.



