शेतकऱ्यांना दिलासा : आद्राचा पाऊस धो-धो बरसला
भुसावळ : गेल्या काही दिवसांपासून हुलकावणी दिलेल्या पावसात रविवारचा मुहूर्त काढत हजेरी दिल्याने शेतकरी वर्ग सुखावला आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून पाऊस गायब झाल्याने शेतकरीवर्ग आतुरतेने आभाळाकडे डोळे लावून बसला होता. रविवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास शहरात हलक्या स्वरूपात पाऊस बसण्यास सुरुवात झाली, त्यानंतर सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने शहरातील रस्ते न्हाऊन निघाले. दरम्यान, पावसाच्या आगमनामुळे शहरासह विभागातील शेतकरी वर्ग सुखावला आहे. खरीपाच्या पेरणीसाठी हा पाऊस लाभदायी मानला जात आहे तर मान्सूनपुर्व कपाशीसाठीदेखील या पावसाचा मोठा फायदा होणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. दरम्यान, सोमवारपासून खतांची पहिली मात्रा देण्यास सुरुवात होणार असल्याचे सांगण्यात आले.
खरीपाच्या पेरण्यांना येणार वेग
रविवारच्या दमदार पावसाच्या आगमनामुळे भुसावळ विभागात खरीपाच्या पेरण्यांना मोठ्या प्रमाणावर वेग येणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. यंदा कपाशीसह मका लागवडीवर शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर भर असणार आहे. शेतकऱ्यांनी मान्सूनपूर्व कपाशीची लागवड केली असून रविवारच्या पावसामुळे या कपाशीची वाढ होण्यासाठीदेखील फायदा होणार आहे. सोमवारपासून खतांची पहिली मात्रादेखील देण्यास सुरुवात होईल असेही शेतकऱ्यांनी सांगितले.



पाऊस येताच वीज झाली गुल
रविवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास शहरात मुसळधार पावसाला सुरुवात होतात शहराचा वीजपुरवठा ठप्प झाला. सायंकाळी उशिरापर्यंत वीजपुरवठा ठप्प असल्याने व्यापाऱ्यांचा नागरीकांचे चांगलेच हाल झाले. शहरातील अनेक भागात अलीकडेच डांबरीकरणाची कामे झाली असून मुसळधार पावसामुळे रस्ते कितपत तग धरणात याकडे आता शहरवासीयांचे लक्ष लागले आहे. शहरातील अनेक सखल भागात पावसामुळे तळे निर्माण झाले चित्र होते.

