भुसावळातील स्वामी विहार परीसर विकासापासून वंचित


शिवसेना पदाधिकारी साकेगाव ग्रामपंचायतीवर धडकणार

भुसावळ : शहरातील जळगाव रोडवरील स्वामी विहार परिसरात गटारी आणि पाणी प्रश्न गंभीर बनलेला आहे. विस्तारीत भागात ड्रेनेज, गटारी नसल्याने उघड्यावर पाणी येत असल्याने आरोग्याचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. साकेगाव ग्रामपंचायत हद्दीत येत असल्याने भुसावळ नगरपालिका लक्ष देत नाही, तर ग्रामपंचायतचा टॅक्स भरूनही ग्रामपंचायत प्रशासन जाणूनबुजून दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरीक करीत आहे. नागरीकांच्या समस्या सोडवण्यासाठी मंगळवारी विसेना उपजिल्हाप्रमुख प्रा.उत्तम सुरवाडे, विधानसभा क्षेत्रप्रमुख संतोष सोनवणे, तालुका संघटक प्रा.धीरज पाटील, उपतालुकाप्रमुख हिरामण पाटील, शहरप्रमुख निलेश महाजन, शहरप्रमुख बबलू बर्‍हाटे, माजी नगरसेवक दीपक धांडे साकेगाव ग्रामपंचायत प्रशासनाशी चर्चा करणार आहेत.

ग्रामपंचायत अनुदान बंदची मागणी करणार
आमच्या भागात साकेगाव ग्रामपंचायतीच्या ढिसाळ कारभारामुळे समस्या कायम आहेत. गटारी असून तेथे स्वच्छता नाही, काही भागात गटारी नाही. या समस्या न सुटल्यास ग्रामपंचायतीचे सर्व प्रकारचे अनुदान बंद करावे, अशी मागणी करणार असल्याचे स्वामी विहारातील रहिवासी चारुशीला बोदडे म्हणाल्या. दरम्यान, या परीसरातील समस्या सोडवण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. तरीही कामे सुरू केली नाहीत. वरीष्ठ अधिकार्‍यांनी लक्ष न घातल्यास शिवसेनेतर्फे आंदोलन करणार असल्याचे माजी नगरसेवक दीपक धांडे म्हणाले.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !