खिरोद्याच्या तरुणाला लग्न पडले महागात : दिड लाखात गंडवले ; नववधूसह सात जणांविरुद्ध


सावदा : खिरोद्यातील तरुणाला लग्नाच्या बंधनात अडकणे महागात पडले असून या प्रकरणी नववधूसह सात जणांविरोधात सावदा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. नववधूला पसार होण्यापूर्वीच पोलिसांनी अटक केली. नाजनीन जान मोहम्मद खान (टाटानगर, भिवंडी) असे अटकेतील महिला आरोपीचे नाव आहे. खोटे लग्न करून पैसे उकळणार्‍या टोळीतील सदस्यांचा सावदा पोलिसांकडून शोध सुरू करण्यात आला आहे.

आई आजारी असल्याचे सांगून रक्कम उकळली
खिरोद्यातील रहिवासी मिलिंद इंगळे (34) या तरुणाचे नुकतेच लग्न झाले मात्र नववधूने लग्नाच्या चार दिवसानंतर आईला कॅन्सरचा आजार असल्याचे सांगत त्यासाठी दिड लाखांची मागणी केली व यादरम्यान नववधूची बहिणदेखील आल्याने वराकडील मंडळींनी रक्कम देवून टाकली. याचवेळी नववधू पळण्याच्या बेतात असतानाच वराकडील मंडळींना हा प्रकार लक्षात आल्याने त्यांनी सावदा पोलिसांना माहिती कळवली. या प्रकरणी मिलिंद इंगळे यांच्या फिर्यादीनुसार नववधू नाजनीन जान मोहम्मद खान, लालचंद ओंकार म्हसकर (पिंप्राळा जामठी, ता.सोयगाव, जि. औरंगाबाद), विशाल पाटील, नवरीची चुलत बहिण (नाव माहिती नाही), अंकुश खडसे, हर्षल पाटील, लताबाई यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहा.निरीक्षक डी.डी.इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली आर.डी.पवार करीत आहेत.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !