आपले मानवाधिकार फाऊंडेशनतर्फे गरजूंना किराणा साहित्याचे वाटप
भुसावळ : आपले मानवाधिकार फाऊंडेशनतर्फे शहरासह तालुक्यात गरजूंना किराणा साहित्याचे वाटप नुकतेच करण्यात आले. कोरोना काळात अनेकांच्या हाताचा रोजगार हिरावल्याने त्यांच्यापुढे संकट उभे ठाकले असतानाच या उपक्रमामुळे मात्र गरजूंना मोठा दिलासा मिळाला. आपले मानवाधिकार फाऊंडेशनचे संचालक डॉ.दीपेश पष्टे तसेच सहसंचालक वैभव हरड यांच्या मार्गदर्शनाखाली फाऊंडेशनचे भुसावळ तालुकाध्यक्ष मयूर राजेंद्र अंजाळेकर तसेच साने गुरुजी नगर मित्र परीवारातर्फे हा उपक्रम राबवण्यात आला.




उपक्रमाने तृतीयपंथीय भारावले
शहरासह तालुक्यात गरजू कुटुंबाला एका महिन्याचा किराणा प्रसंगी वाटप करण्यात आला तसेच समाजातील उपेक्षीत घटक असलेल्या तृतीय पंथीय बांधवांनादेखील प्रसंगी मदतीचा हात देण्यात आल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी गरजूंना पाच किलो तांदूळ, पाच किलो गहू, पाच किलो तुरीची दाळ, दोन किलो साखर, पावशेर चहा पावडर, टुथपेस्ट, अंघोळीचा, कपड्यांचा व भांडण्याचा साबण, गाईचे तुप, तेल, बिस्कीट पुडा आदी किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले. गतवेळी फाऊंडेशनतर्फे एक हजार 432 गरजूंना मदत करण्यात आली होती, असे मयूर अंजाळेकर म्हणाले. अंजाळेकर यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत त्यांना फोरेव्हर स्टार इंडियने द रीयल सुपर हीरोचा पुरस्कार देवून गौरवले आहे. उपक्रमप्रसंगी राजेंद्र दत्तात्रय अंजाळेकर, प्रशांत राजेंद्र अंजाळेकर, प्रथमेश बाणाईत, भाजयुमो भुसावळ शहर प्रसिद्धीप्रमुख प्रशांत भट उपस्थित होते.

